Nagpur News : उपराजधानीत होणार पहिले मुस्लिम मराठी साहित्य संमेलन; साहित्यिकांसाठी मोठी पर्वणी
भारतीय मुस्लिम परिषदेच्या वतीने पहिले राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन उपराजधानी नागपुरात होणार आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील तमाम साहित्यप्रेमी, साहित्यिकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.
Muslim Marathi Sahitya Sammelan : भारतीय मुस्लिम परिषदेच्या वतीने पहिले राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन उपराजधानी नागपूरात (Nagpur) होणार आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील तमाम साहित्यप्रेमी आणि साहित्यिकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. 18 फेब्रुवारीला नागपूरातील पंचशील (Nagpur News)चौक येथे असलेल्या टिळक पत्रकार भवन सभागृहात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. मराठी साहित्य सार्वस्वतात मुस्लिम मराठी साहित्य प्रवाह स्थिरावला असून या संमेलनात कथा, कादंबरी, वैचारिक लेखन आणि ऐतिहासिक लेखनावर राज्यभरातील लेखक चर्चा करणार आहेत.
अध्यक्षपदी मुंबईतील फरझाना इक्बाल-डांगे
मुंबईतील फरझाना इक्बाल-डांगे यांची या पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हे संमेलन भारतीय संविधानाला समर्पित करण्यात आले आहे.फरझाना इकबाल डांगे या शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या एम.ए. अर्थशास्त्र पदवीधर असून त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दादर शाखेच्या त्या माजी अध्यक्ष आणि सध्या मुंबई जिल्हाध्याच्या प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. नाशिकच्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनातील कवयित्री संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी त्यांना मिळाली होती. आता नागपूर येथे भरणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांना देण्यात आले आहे.
राज्यभरातील साहित्यिकांची मांदियाळी
पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात प्रा फ.म. शहाजिंद (लातूर), अॅड. फिरदोस मिर्झा (नागपूर), प्रा. युसूफ बेन्नूर (औरंगाबाद), निरंजन टकले (नाशिक), प्रा. मुहिद कादरी (उस्मानाबाद), डॉ. अमिताभ पावडे (नागपूर), जगजित सिंग (नागपूर), डॉ. शाहीद जाफरी (नागपूर), शकील पटेल (नागपूर), प्रा. दशरथ मडावी (नागपूर), शालिक जिल्हेकर (नागपूर), अब्दुर कादर मुकादम (मुंबई), प्रा. अनिस बेग (वर्धा), प्रा. सय्यद अल्लाउद्दीन (बीड), डॉ. रफिक शेख (नाशिक), डॉ. रोशन खान (नागपूर), प्रा. मनोहर नाईक (नागपूर), डॉ. भोला सरवर (नागपूर), दत्तात्रय कल्याणकर (धुळे), स्नेहा फदाले (मुंबई), अंजना कर्णिक (मुंबई), सुप्रिया गोटेकर (अकोला), वकील अहमद शेख (आलापल्ली), डॉ. प्रकाश राठोड विविध परिसंवाद, मुक्त चर्चेत सहभागी होणार आहेत. भारतीय मुस्लिम परिषद, डॉ. मेघनाथ साहा सांस्कृतिक विचार मंच, फुले-शाहू-आंबेडकरी विचार मंच आणि छवि पब्लिकेशन्स या संस्थांमार्फत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनाच्या आयोजनासाठी प्रा. रमेश पिसे, प्रा. असलम बारी, डॉ. वहीद पटेल, रजनी बोधी, फिरोज अहमद, अॅड. वकील अख्तर, हिफजुर्रहमान खान, वहीद खान, सुषमा कळमकर, मिर्जा वहाब बेग, राजीक खान, मोहसीन शेख, हनिफ कुरेशी, आबिद कुरेशी, सय्यद मुजम्मील परिश्रम घेत आहेत. भारतीय मुस्लिम परिषद, फुले आंबेडकरीय विचार मंच यांच्या सहकार्यातून हे संमेलन होत आहे. माहितीसाठी 8459563489 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या