नागपूरातील पोलीस शिपायाला लुटमारीच्या प्रकरणात मध्यप्रदेशात अटक
नागपूरातील एका पोलीस शिपायाला लुटमारीच्या आरोपाखाली मध्यप्रदेशात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची इभ्रतीची लक्तरे अशी वेशीवर टांगणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
नागपूर : नागपूरातील एका पोलीस शिपायाला लुटमारीच्या प्रकरणात मध्यप्रदेशात अटक झाली आहे. दीपक निमोणे नावाच्या या पोलीस शिपायाने सुट्टीच्या दिवशी मध्यप्रदेशात जाऊन 54 हजारांची लूटमार केली होती. मध्यप्रदेश पोलिसांनी त्याला चार सहकाऱ्यांसह अटक केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांवर आपल्या शिपायाला निलंबित करण्याची नामुष्की ओढवली आहे.
नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाला मध्यप्रदेश मधील बालाघाट जिल्ह्यातील तिरोडी पोलीस ठाण्यात लूटमारीच्या प्रकरणात अटक झाली आहे. दीपक निमोणे असे अटक झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून दीपक नागपुरातील काही कुख्यात गुन्हेगारांसह सुट्टीच्या दिवशी मध्यप्रदेशात गेला होता. चौघांनी मध्यप्रदेशमधील तिरोडी येथे हितेश पारधी नावाच्या शेळी खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला लुटलं. या चौघांनी व्यवसायिकाच्या डोळ्यात लाल तिखट पावडर टाकून त्याच्या जवळील 54 हजार रुपयांची रोकड लुटली होती. पीडित व्यवसायिकाने त्याच्या व्यापाराच्या गरजेसाठी तिरोडीमधील एका एटीएममधून रोख रक्कम काढली होती. आरोपींनी हितेश पारधीचा एटीएम सेंटरपासून पाठलाग सुरु केला होता. जेव्हा हितेश त्याच्या दुचाकीवर खादीटोला भागात एका कालव्याच्या शेजारून जात होता. तेव्हा संधीचा फायदा घेत कारमधून आलेल्या चौघांनी त्याच्या डोळ्यात तिखट टाकले आणि हितेशच्या हातातून रोकड लुटून पळ काढला होता.
योजनाबद्ध पद्धतीने झालेल्या या लुटीच्या घटनेनंतर बालाघाट जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. मात्र, पोलीस आणि गुन्हेगारांची युती घडलेल्या लुटारुंच्या या टोळीने त्यांची ओळख लपवण्यासाठी त्यांच्या कारच्या नंबर प्लेटवर चिखल माखला होता. त्यामुळे मध्यप्रदेश पोलिसांनी चिखल लागलेली कार या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला होता. आरोपींना जेरबंद करण्यासाठी मध्यप्रदेश पोलिसांनी दहा हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. दरम्यान, मध्यप्रदेशातील लांजी भागात एका कारमध्ये चार संशयित इसम फिरत असल्याची माहिती समोर येताच मध्यप्रदेश पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. तेव्हा सर्व आरोपींनी त्यांचा गुन्हा कबुल केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक आरोपी हा नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई असल्याचे मध्यप्रदेश पोलिसांना कळले. तेव्हा त्यांनी महाराष्ट्र पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. धक्कादायक बाब म्हणजे, दीपक निमोणे नावाचा हा पोलीस शिपाई आवश्यक कामाच्या निमित्ताने सुट्टीवर होता आणि नागपुरातील सराईत गुन्हेगारांना घेऊन मध्यप्रदेशात लुटीचे काम करत होता. महाराष्ट्र पोलिसांची इभ्रतीची लक्तरे अशी वेशीवर टांगणाऱ्या दीपक निमोणे याला पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ निलंबित केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
मुंबईतील जे.जे रुग्णालयात महिला डॉक्टरची छेडछाड; आरोपी वॉर्डबॉयला अटक
बारामतीत मुलगी झाली म्हणून नवऱ्याची महिलेला रुग्णालयात शिवीगाळ करत मारहाण!
चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करी करण्यासाठी आयशर टॅम्पो मॉडीफाय; तब्बल 10 लाखांची दारू जप्त