Maoist On PFI Ban: पीएफआयवरील बंदी म्हणजे फॅसिस्ट हिंदुत्ववादी अजेंडा; माओवाद्यांची सरकारवर टीका
Maoist On PFI Ban: माओवाद्यांनी पीएफआयवरील बंदीचा निषेध केला आहे. ही कारवाई म्हणजे ब्राह्मण्यवादी हिंदुत्वादी राजकारणाचा अजेंडा असल्याचे माओवाद्यांनी म्हटले.
Maoist On PFI Ban: दहशतवाद्यांशी संबंधित असल्याने आणि देशविरोधी कारवायात असल्याच्या कारणाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (PFI) बंदी घालण्यात आली आहे. या बंदीचा माओवाद्यांनी (Maoist) निषेध केला आहे. अशा प्रकारची बंदी आधीच दडपलेल्या मुस्लिमांचे अपराधीकरण करण्याची प्रक्रिया असल्याचे माओवाद्यांनी म्हटले आहे. माओवाद्यांनी ही बंदी उठवण्याची मागणी केली आहे. ही बंदी म्हणजे हिंदुत्ववादी राजकारणाचा अजेंडा असल्याची टीका माओवाद्यांनी केली आहे.
माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने प्रवक्ता अभय याच्या नावाने पत्रक जारी केले आहे. माओवाद्यांनी म्हटले की, एनआयएने देशभरात कारवाई करत 100 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली असून 250 जण ताब्यात घेतले आहेत. पीएफआयवर बंदी घालताना सरकारने तीन कारणे दिली आहेत. यामध्ये, पीएफआय आणि संबंधित संघटनांकडून हिंसक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दुसरं कारण म्हणजे पीएफआयकडून देशातील शांतता भंग केली जात आहे. पीएफआय हे देशाच्या सुरक्षितेसाठी धोकादायक असल्याचे तिसरं कारण देण्यात आले आहे. ही सगळी कारणे ब्राह्मणी हिंदुत्ववादी फॅसिझमला विरोध करणाऱ्यांची गळचेपी करणारी असून दुसरं कोणतंही ठोस कारण नाही, असेही माओवाद्यांनी म्हटले.
मुस्लिमांची मतपेढी म्हणून वापर
माओवाद्यांनी राजकीय पक्षांवरही निशाणा साधला आहे. देशातील सर्व संसदीय पक्षांनी मुस्लिम समूहाचा मतपेढी म्हणून वापर केला आहे. मुस्लिम समुदायाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक विकासाकडे राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले असल्याचे माओवाद्यांनी म्हटले आहे. सरकारकडून गोरक्षक, अॅन्टी रोमियो पथक, द्वेषपूर्वक भाषण करणाऱ्यांना मदत करते. तर, दुसरीकडे मुस्लिम व्यक्तिंच्या मालमत्ता बेकायदेशीर असल्याचे सांगत बुलडोझर कारवाई केली जात आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर देशात इस्लामिक फोबिया वाढवत असल्याचा आरोप माओवाद्यांनी केला आहे. देशातील मुस्लिम आणखी गरीब होत चालला असल्याचेही त्यांनी म्हटले.
निवडणुकीतील फायद्यासाठी कारवाई
आगामी विधानसभा आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील फायद्यासाठी पीएफआयवर बंदी घालण्यात आली असल्याचे माओवाद्यांनी म्हटले. पीएफआयवर बंदी घालून भाजप ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे माओवाद्यांनी म्हटले. विरोध करणाऱ्या संघटनांना धमकावण्यासाठी बंदी घालण्याचे राजकीय हत्यार केंद्र सरकार वापरत असल्याचे माओवाद्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: