नागपुरात कोरोना संक्रमण हाताबाहेर? मुंबई मनपा आयुक्तांनी दिल्या महत्वाच्या सूचना
नागपूर म्हणजे, राज्याची उपराजधानी... मुंबई, पुणे आणि ठाण्याच्या तुलनेत लोकसंख्या कमी आहे. लोकसंख्येचे घनत्व कमी असल्याने दाटिवाटीही नाही. मात्र, गेल्या काही आठवड्यात नागपुरात कोरोनाचा फैलाव तीव्रतेने झाल्याचं पाहायला मिळत आहे.
नागपूर : नागपुरात कोरोनाचा संक्रमण हाताबाहेर का जात आहे. या संदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्या नेतृत्वात नागपुरात दाखल झालेल्या उच्च स्तरीय तज्ज्ञ समितीने नागपूरच्या स्थितीचा अभ्यास करत अत्यंत महत्वाच्या सूचना केल्या आहेत. शिवाय एकेकाळी नागपुरात स्थिती नियंत्रणात असताना परिस्थिती का बिघडली आणि कोरोनाचा विळखा शहरावर घट्ट का बसला याबद्दलची कारणमीमांसा ही त्यांनी केली आहे. त्यामुळे नागपुरात अधिकाऱ्यांमधील इगोच्या लढाईत बिघडलेली परिस्थिती आता नियंत्रणात येईल अशी अपेक्षा आहे.
नागपूर म्हणजे, राज्याची उपराजधानी... मुंबई, पुणे आणि ठाण्याच्या तुलनेत लोकसंख्या कमी आहे. लोकसंख्येचे घनत्व कमी असल्याने दाटिवाटीही नाही. मात्र, गेल्या काही आठवड्यात नागपुरात कोरोनाचा फैलाव तीव्रतेने झाला. काही महिन्यांपूर्वी नागपुरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच नागपूरचा रिकव्हरी रेट देशपातळीवर आदर्श मानला जात होता. त्याच नागपुरात गेले 10 ते 15 दिवस रोज हजारो कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. तर रोज 40 ते 50 रुग्णांचा मृत्यूही होत आहे. त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला होता की, नागपुरात स्थिती का बिघडली. गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांच्या नेतृत्वात 5 सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीने काल नागपूरचा दौरा केला. इथल्या प्रशासनाशी बोलून नागपूरच्या स्थितीचा अभ्यास करत काही सूचना केल्या आहेत.
इक्बाल चहल समितीने केलेल्या सूचना :
- कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी टेस्टिंग वाढवा.
- सर्व प्रकारच्या टेस्टिंगचे रिपोर्ट 24 तासांच्या आत आलेच पाहिजे.
- टेस्टिंग नंतर त्याच प्रमाणावर रुग्णालय, एम्ब्युलन्स सेवा आणि रुग्णांचे व्यवस्थापन यावर लक्ष द्यावे.
- रुग्णांना खाटा उपलब्ध होत आहे की नाही यावर काटेकोरपणे लक्ष द्यावे.
- रुग्णालयात काही खाटा संशयित रुग्णांसाठी त्वरित उपलब्ध होतील अशा स्वरूपात उपलब्ध ठेवावे.
- रुग्णालयात किती खाटा आहेत, किती रिकामे आहेत यावर नजर ठेवणारे डॅशबोर्ड तयार करावे, ते दर अर्धा तासांनी अपडेट व्हावे.
- वरिष्ठ धिकाऱ्यानी स्वतः बाधित वस्त्यां आणि झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन स्थिती समजावी.
- ज्या रुग्णांकडे वेगळे स्वच्छता गृह नाही, घरी कमी जागा आहे त्यांच्या कुटुंबियांना क्वॉरंटाईन करावे.
- महापालिकेच्या प्रत्येक झोन स्तरावर वॉर रूम उभारावे, तसेच वॉर रूममधून ज्या भागात उद्रेक आहे. त्या भागातील लोकप्रतिनिधींना देखील वस्तुस्थिती कळली पाहिजे.
- इतर सरकारी विभाग आणि खाजगी एजेन्सीचे वाहन घेऊन मोबिलिटी वाढवावी.
- खासगी असो वा सरकारी प्रत्येक हॉस्पिटल मध्ये वॉर रूम उघडल्या गेली पाहिजे.
- सोशल मीडियावर आणि अन्य माध्यमात येणाऱ्या चुकीच्या पोस्ट, बातम्यांचे खंडन करण्यात आले पाहिजे.
- कोरोना विरोधातला लढा दीर्घकालीन आहे. त्यामुळे तयारी ही तशीच करावी लागणार आहे.
विशेष म्हणजे नागपूरच्या स्थितीचा अभ्यास केल्यानंतर इक्बाल चहल यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत एका महत्वाच्या मुद्द्यावर ही बोट ठेवल्याची माहिती आहे. ते म्हणजे नागपुरात कोरोना विरोधातला लढा काही कारणांमुळे विभागला गेला. तो मुंबई किंवा इतर शहरांसारखा एकछत्री राहिला नाही. त्यामुळे आता अधिकाऱ्यांनी इगो बाजूला ठेऊन एकछत्री खाली त्यांचे प्रयत्न एकत्रीत आणावे आणि नागपूरची कोरोना विरोधातली लढाई बळकट करावी अशी सूचना ही केली. इक्बाल चहल यांच्या सोबत या उच्च स्त्रिया पथकात डॉ. हेमंत शहा, डॉ. राहुल पंडित, डॉ. मुजल लकडावाला, डॉ. गौरव चतुर्वेदी यांचा ही सहभाग होता.
महत्त्वाच्या बातम्या :