Vidarbha Flood : मातीच्या घरांसाठी नियम बदला, सलील देशमुखांची केंद्रीय पथकाकडे मागणी
मातीच्या घराला ओलावा लागल्याने भविष्यात पडण्याची शक्यता आहे. यामुळे अशा घरांचा सुद्धा नियमामध्ये बदल करून पंचनामांमध्ये समावेश करावा अशी मागणी सुद्धा यावेळी देशमुख यांनी केंद्रीय पाहणी पथकाला केली.
नागपूर: जिल्ह्यामध्ये नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे आधीच आर्थिक टंचाईत असलेल्या शेतकऱ्याला दिलासा देणे महत्त्वाचे आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेता जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी विदर्भात पाहण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडे केली.
नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास 30 हजार हेक्टर मधील कापूस, तूर, सोयाबीन, फळभाज्या, संत्रा व मोसंबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुरामुळे नदी व नाल्या काठची शेती पूर्णपणे खरडुन गेली आहे. सध्याची परिस्थिती बघता पूर्ण पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये नुकसानीची टक्केवारी ही मोठ्या प्रमाणात आहे. केंद्रीय पथकाकडून नुकसान पाहणी दौऱ्यात नागपूर जिल्हा असायला पाहिजे होता. परंतु तो समावेश नसल्याने केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यावर नागपूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहे. केंद्रीय पथकाने आता तरी नागपूर जिल्ह्यामध्ये पाहणी करून नागपूर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सलील देशमुख यांनी यावेळी केली. यावेळी वासुदेवराव गाखरे, डॉ अनिल ठाकरे, ओम खत्री, निळकंठराव उमाठे सोबत होते.
मातीच्या घरांसाठी नियम बदला
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मातीच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. परंतु सध्या जी घरे पडली आहे त्याचाच पंचनामा करताना समावेश करण्यात आलेला आहे. परंतु ज्या मातीच्या घराला ओलावा लागलेला आहे ती घरे भविष्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अशा घरांचा सुद्धा नियमामध्ये बदल करून पंचनामांमध्ये समावेश करावा अशी मागणी सुद्धा यावेळी देशमुख यांनी केंद्रीय पाहणी पथकाला केली.
निकषात न बसणारे इतर नुकसानीचे प्रमाण अधिक
अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीच्या सद्यस्थितीत असणाऱ्या निकषात बसणाऱ्या नुकसानीसोबतच इतर नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. विभागात पुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांना दुबार पेरणी, खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानीसाठी केंद्राने तात्काळ मदत करावी, अशी मागणी प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी केली. राज्यातील परिस्थितीबाबत यावेळी त्यांनी माहिती दिली. या बैठकीस विभागातील सर्व अंमलबजावणी यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतपिकांसह घरे, रस्ते, सिंचन प्रकल्प आदी विविध पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. केंद्रीय पथकाने नुकसानीसंदर्भात आढावा घेतला असून केंद्र शासनाला सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा सहसचिव राजीव शर्मा यांनी यावेळी दिली.