NMC Budget : महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पासाठी नागरिकांकडून सूचना; कशा पाठवायच्या आपल्या सूचना, जाणून घ्या
अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ न करण्याच्या सरकारच्या मर्जीनुसारच आयुक्त अर्थसंकल्प तयार करत असल्याचे सूत्रांची माहिती आहे. मात्र निवडणूका लांबविण्याची चिन्हे असल्याने हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे.
Nagpur Municipal Corporation Budget : महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना प्रथमच नागपूरकरांच्या संकल्पना व सूचनांचा आधार घेतला जाणार आहे. आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी नागपूरकरांना विकासकामेच नव्हे तर महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याबाबत काही संकल्पना असेल तर पाठवा, असे आवाहन केले. या अभिनव प्रयोगामुळे सामान्य नागपूरकरांनाही प्रथमच प्रत्यक्षपणे शहराच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळाली आहे.
महापालिकेचे प्रत्यक्ष उत्पन्न व खर्चावर आधारित अर्थसंकल्प तयार करून आयुक्त तो स्थायी समितीकडे सादर करताना नागपूरकरांनी बघितले. यात लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक (Corporator) सूचना मांडून शहराच्या वर्षातील विकासाचा मॉडेल सभागृहातून मंजूर केला जातो, ही प्रक्रिया पार पाडण्यात येते. परंतु गेल्या वर्षभरापासून महापालिकेत प्रशासकराज आहे. त्यामुळे आयुक्तांवरच 2023-24 या वर्षासाठी अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी आहे. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी मनपात (NMC) नसल्यामुळे आयुक्तांनी आता थेट लोकांनाच अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला.
या विषयांवर मांडता येणार सूचना...
- नागरिकांनी आपल्या प्रभागात भेडसावणाऱ्या महत्वाच्या समस्यांच्या निराकरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणे आवश्यक आहे. सदर समस्या वैयक्तिक नसून व्यापक स्वरूपाची असावी.
- शहर सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीकोनातून राबविण्यात येऊ शकणाऱ्या विविध उपाययोजना.
- नागरिकांना मूलभूत सोईसुविधा प्रदान करणारी - उदाहरणार्थ - रस्ते, पाणी, स्वच्छता, परिवहन आदी साठी आपल्या सूचना.
- नागपूरला राज्यातील क्रमांक एकचे शहर करण्यासाठी सूचना
- जबाबदार नागरिक आणि संवेदनशील प्रशासन या दृष्टीकोनातून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लागू करता येणाऱ्या उपाययोजना.
- उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातून आपल्या सूचना
- मनपाच्या उत्पन्नाचे मर्यादित स्रोत पाहून नागरिकांनी आपल्या सूचना द्याव्या.
सर्व सूचना 10 दिवसाच्या आत नमूद ई मेल आई डी (Email ID : financedepttnmc@gmail.com) वर पाठविण्यात यावे, असे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात आले आहे.
मनपा निवडणुका लांबणार...
आता शिक्षक मतदार संघातील पराभवाचा परिणाम नागपूरकर मतदारांवर होण्याची शक्यता बघता नागपूर महापालिका निवडणूक दिवाळीपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. परंतु या अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ न करण्याच्या सरकारच्या मर्जीनुसारच आयुक्त अर्थसंकल्प तयार करत असल्याचे सूत्रांची माहिती आहे. महापालिकेचे आतापर्यंत उत्पन्न व तसेच मार्चपर्यंत अपेक्षित उत्पन्नाच्या आकडेवारीसाठी आयुक्त दररोज विविध विभागांच्या बैठका घेत आहेत. अर्थसंकल्प सादर करण्याची घाई न करता मार्चअखेरचे तिजोरीतील उत्पन्नाचा आधार घेऊनच अर्थसंकल्प सादर करण्याचे आयुक्तांचे मनसुबे असल्याची माहिती आहे.
ही बातमी देखील वाचा...