अशोक चव्हाण यांनी केलेल्या दाव्याचा कट मातोश्रीवर शिजला असेल : चंद्रशेखर बावनकुळे
मग ते 2014च्या निवडणूकीचा निकाल असो किंवा 2019च्या निवडणूकीचा, उद्धव ठाकरे यांची इच्छा भाजपसोबत वेगळे होण्याचीच होतीच, असा आरोपही बावनकुळे यांनी यावेळी केला.
Nagpur News : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) असतानाच शिवसेनेकडून कॉंग्रेस, राष्ट्रवादी (Congress) सोबत आघाडीसाठी प्रस्ताव असल्याचा गौप्यस्फोट कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून यामध्ये भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणे सुरु केले आहे. "अशोक चव्हाण यांनी जो दावा केला आहे त्याचा कट मातोश्रीवर शिजला असेल. उद्धव ठाकरेंनीच तसं ठरवलं असेल आणि एकनाथ शिंदे निरोप घेऊन गेले असतील," असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, "राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार असताना एकनाथ शिंदे हे नेते नव्हते. तेव्हा नेते उद्धव ठाकरेच होते. त्यामुळे भाजपसोबत दगाबजीचा तो निर्णय उद्धव ठाकरेंचाच (Uddhav Thackeray) असेल."
पुढे बावनकुळे म्हणाले, "ज्या काळाबाबात अशोक चव्हाण यांनी दावा केला आहे तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे पदच नव्हते, त्यामुळे ते भाजपसोबत दगाबाजीचा विचारही करु शकत नाहीत." "मग ते 2014 च्या निवडणुकीचा निकाल असो किंवा 2019 च्या निवडणुकीचा, उद्धव ठाकरे यांची इच्छा भाजपसोबत वेगळे होण्याचीच होतीच," असा आरोपही बावनकुळे यांनी यावेळी केला. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "चंद्रकांत खैरे फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळीक साधण्यासाठी असं बोलत आहेत." ते त्यांच्या नजरेत येऊ इच्छितात, असे बोलून बावनकुळे यांनी खैरेंच्या विधानाची खिल्ली उडवली.
पवारांचा काळ गेलाय : बावनकुळे
सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, आता राज्यातील स्थिती बदलली आहे. तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांचा काळ गेला आहे. सुप्रिया सुळे म्हणतात पवार साहेब बाहेर पडले तर निश्चितच सरकार येते. मात्र, आता तो काळ गेला असून बारामती लोकसभा मतदारसंघात फक्त एक बारामती विधानसभा क्षेत्र सोडलं, तर इतर पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला आव्हानात्मक परिस्थिती आहे. आता एकविसावा शतक आहे. पवारांचा काळ संपला आहे, हा मोदींचा काळ आहे."
अशोक चव्हाण काय म्हणाले होते?
2014 मध्ये राज्यात असलेल्या फडणवीस सरकारच्या काळातच शिवसेनेकडून आघाडी सरकार स्थापनेचा प्रस्ताव आला होता. विशेष म्हणजे भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेऊन आलेल्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे हे देखील होते, असंही अशोक चव्हाण (Ashok Shankarrao Chavan) यांनी म्हटलं. अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेना नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडीला आता विरोध करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याबाबत अशोक चव्हाण यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे. अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant Khaire) दावा करत म्हटलं आहे की, "एकनाथ शिंदे 15 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते."
इतर महत्त्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदेंसंदर्भात अशोक चव्हाणांचा खळबळजनक दावा, भाजपा म्हणतेय, चव्हाणांची क्लिपच जाहीर केली तर...