(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : नागपुरातील अजित पवारांच्या घराबाहेर अंगणवाडी सेविकांचे आंदोलन; विजयगड बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
गेल्या अनेक महिन्यांपासून संपावर असलेल्या अंगणवाडी सेविकांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नागपुरातील शासकीय निवासस्थानी अंगणवाडी सेविका आंदोलन करत आहे.
Nagpur News नागपूर : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी (Anganwadi Sevika) राज्यभर संप पुकारला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तो पर्यंत आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम राहणार असल्याचा पवित्रा या अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरात (Nagpur News) गेल्या अनेक महिन्यांपासून संपावर असलेल्या अंगणवाडी सेविकांनी आज पुन्हा एकदा आक्रमक पवित्र घेतला आहे. गुरुवारी 25 जानेवारीला नागपूरातील विजयगड या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) शासकीय निवासस्थानी अंगणवाडी सेविकांनी आंदोलन करत आपले लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी विजयगड या शासकीय निवासास्थानी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात कारण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोठा पोलीस बंदोबस्त
राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करत आपल्या मागण्या लावून धरल्या आहेत. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागपुरातील शासकीय निवासस्थान असलेल्या विजयगड बंगल्यावर अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केले. या आंदोलनात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. गेल्या पन्नासहून आधिक दिवसांपासून या आंगवाडी सेविका आपल्या मागण्यांसाठी नागपुरातील संविधान चौकात शांततेत आंदोलन करत आहेत. मात्र प्रशासनाने या आंदोलनाची कुठलीही दखल न घेतल्याने आता अंगणवाडी सेविकांनी आक्रम पवित्रा घेतला आहे.
23 जानेवारीला अंगणवाडी सेविकांनी नागपूरच्या व्हरायटी चौकात आंदोलन करत रस्ता अडवून धरला होता. त्यानंतर बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत हे आंदोलन शांत केले होते, मात्र त्यानंतर या अंगणवाडी सेविकांनी जेल भरो आंदोलनची तयारी केली होती. त्यामुळे गुरुवारी असा कुठलाही प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
आंदोलनाची दखल न घेतल्याने काम बंद आंदोलन
गेल्या 4 जानेवारीपासून राज्यासह नागपुरात देखील अंगणवाडी सेविकांनी लक्षणीय संप पुकारला आहे. हजारो अंगणवाडी सेविकांनी आपले काम बंद करत आंदोलनात सहभाग घेतला. त्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत या सेविकांना नोटीस बजावत कामावर परतण्याचे आदेश दिले होते. मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत अंगणवाड्यांच्या चाव्या आम्ही देणार नाही, असा निर्धार या सेविकांच्या वतीने करण्यात आला.
त्यानंतर आयटकच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनावर महामोर्चा नेत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाची बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पत्र काढत बैठकीचे देखील आश्वासन दिले. तरी आतापर्यंत बैठक झाली नाही. 21 डिसेंबरला आयटकने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या देवगिरी बंगल्याला घेराव घालत आपल्या मागण्या लावून धरल्या. त्यावरदेखील मार्ग निघाला नाही म्हणून 4 जानेवारीपासून अंगणवाडी सेविकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या बातम्या: