Fadnavis Meets Deshmukh : आशिष देशमुख आणि देवेंद फडणवीस यांच्यात एक तास चर्चा; भेटीनंतर फडणवीसांनी बोलणं टाळलं तर देशमुख म्हणाले....
Nagpur News : काँग्रेसमधून निलंबित असलेल्या आशिष देशमुख यांची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली
Nagpur News : काँग्रेसमधून निलंबित असलेल्या आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. एक तास चाललेल्या या भेटीनंतर फडणवीस आणि बावनकुळे काहीही बोलले नसले तरी आशिष देशमुख यांनी ही सदिच्छा भेट होती, फडणवीस हे विदर्भाचा विकास घडवणारे एकमेव नेते आहेत आणि पक्ष विरहित संस्कृतीच्या नात्याने ते माझ्याकडे आले होते अशी प्रतिक्रिया दिली. मात्र या भेटीमागे शुद्ध राजकारण असून नागपूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या दोन माजी मंत्र्यांना शह देण्यासाठी भाजप आशिष देशमुख यांच्या माध्यमातून राजकीय खेळी खेळत असल्याचं या भेटीमागून दिसून येत आहे.
देवेंद्र फडणवीस आज नागपूर (Nagpur News) जिल्ह्यातील हिंगणा आणि उमरेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र त्यापूर्वी ते देशमुखांच्या घरी पोहोचले. यावेळी फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील आहेत. आता देवेंद्र फडणवीस आणि आशिष देशमुख यांच्या भेटीमुळे देशमुख भाजपच्या वाटेवर आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
काय आहे भाजपची खेळी?
नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघातून 1995 पूर्वी आशिष देशमुख यांचे वडील रणजित देशमुख निवडणूक लढवत होते. तेव्हापासून काँग्रेसचा एक मोठा गट रणजीत देशमुख यांना मानणारा असून त्यामुळे आशिष देशमुख यांना सावनेरमधून भाजपची उमेदवारी दिल्यास सुनील केदार यांच्यासमोर दमदार उमेदवार देता येईल अशी भाजपची खेळी आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आशिष देशमुख सामनेरमधून भाजपचे उमेदवार राहिले होते आणि अवघ्या 3 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. दुसऱ्या बाजूला 2014 मध्ये काटोलमधून आशिष देशमुख यांनीच अनिल देशमुख यांना पराभूत केले होते. त्यामुळे त्यांना काटोलमधून उमेदवारी दिल्यास अनिल देशमुख यांची कोंडी करता येईल असा भाजप श्रेष्ठींना वाटतंय आणि त्यामुळेच ते आशिष देशमुख यांना सावनेर किंवा काटोलमधून भाजपचा उमेदवार म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत का असं चित्र आजच्या भेटीनंतर निर्माण झाला आहे.
आशिष देशमुखांना भाजपकडून सावनेरमधून उमेदवारी मिळणार?
आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत नागपूरजवळच्या सावनेर मतदारसंघातून आशिष देशमुख यांना भाजपचं तिकीट मिळणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. कारण आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून तात्पुरतं निलंबित केलं आहे. तसंच, सावनेरमध्ये सध्या भाजपचा आमदार नाही. त्यामुळे यंदा देशमुखांना संधी मिळणार का, हे पाहावं लागेल.
संबंधित बातमी
देवेंद्र फडणवीस आशिष देशमुख यांच्या भेटीला, सावनेरमधून देशमुखांना भाजपकडून उमेदवारी?