Vidarbha Weather Update: भर उन्हाळ्यात पावसाची झड; अमरावती जिल्ह्यात 55 हजारांहून अधिक हेक्टरचे नुकसान, 1566 घरांची पडझड
Vidarbha Weather Update: सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे एकट्या अमरावती जिल्ह्यात तब्बल 55 हजार 596 हेक्टर वरील शेतपिकांचं नुकसान झाले आहे. तर 1566 घरांची पडझड झाली आहे.
Vidarbha Weather Update: हवामान विभागानं (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यासह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) सलग चौथ्या दिवशी दमदार हजेरी लावली आहे. भर उन्हाळ्यात सलग कोसळणाऱ्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने अक्षरक्ष: शेतकाऱ्यांची दाणादाण उडवली आहे. अशातच दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे एकट्या अमरावती जिल्ह्यात (Amravati Rain) तब्बल 55 हजार 596 हेक्टर वरील शेतपिकांचं नुकसान झाले आहे. तर 1566 घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. तर दुसरीकडे विदर्भातील अकोला, वर्धा, वाशिम, बुलढाणासह इतरत्रही आज दमदार पावसासह विजांचा कडकडाट आणि 30-60 प्रति तास सोसाट्याचा वारा अनुभवायला मिळाला आहे. तर पुढील दोन दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाजही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.
भर उन्हाळ्यात पावसाची झड
राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. आजही अनेक भागात पावसाची शक्यता (Maharashtra Rain) नागपूर हवामान विभागाने वर्तवली होती, त्याप्रमाणे आज पहाटेपासून नागपूरसह विदर्भातील बहुतांश भागात दमदार पावसाच्या सरी कोसळत असल्याचे चित्र आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली होती. त्यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, अलिकडे झालेल्या अवकाळी पावसामुळं वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकडया पासून सुटका झाली आहे. तर दुसरीकडे या अवकळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना झाल्याचेही चित्र आहे. आज बुलढाण्यातील अनेक भागात सलग चौथ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि तुफान गारपीट झाली आहे. यात जिल्ह्यातल्या मेहकर , मोताळा तालुक्यात गारपीटीमुळे शेतमालाचे मोठ नुकसान झाले आहे. यात संत्रा, तीळ, लिंबू, गहू, ज्वारी, भाजीपाला, केळी, आंबा आणि पपईचा समावेश आहे.
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
विदर्भासह मराठवाड्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यात बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातले आहे. यामुळे आंबा, टरबूज यांच्यासह भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या बागा अक्षरक्ष: उद्ध्वस्त झाल्या आहेत. टरबूज, उन्हाळी बाजरी आणि भाजीपाल्याच्या पिकांचे देखील अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकळीने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी या पिकांच्या नुकसानाची तात्काळ पाहणी आणि पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या