Nagpur News: विधानसभा अध्यक्षांविरोधातील आंदोलन भोवलं; ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांसह 10 जणांना अटक
Nagpur News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात आंदोलन करणे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना भोवले आहे. नागपूरचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले यांच्यासह 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे .
Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी ( MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरयांच्या विरोधात आंदोलन करणे नागपूरातील (Nagpur News) ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना चांगलेच भोवले आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले (Devendra Godbole) यांच्यासह 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून गोडबोले हे आपल्या कार्यकर्त्यांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात आंदोलन करत होते. आंदोलन करताना त्यांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली होती. तसेच मुंडन आंदोलनही केले होते. या प्रकरणी शुक्रवारी रात्री मैदा पोलिसांनी देवेंद्र गोडबोले यांच्यासह दहा जणांना अटक केली आहे.
गोडबोलेंसह त्यांच्या 10 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवार 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय दिला. राहुल नार्वेकर यांनी शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचाच असल्याचं सागितलं. त्याशिवाय भरत गोगावले यांचा व्हीप वैध असल्याचं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं. राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालात दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. त्यांनी ठाकरे गट अथवा एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही.
याच पार्श्वभूमीवर नागपुरातील ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या कार्यकर्त्यांसह राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आंदोलन करत होते. मौदा पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. आंदोलनादरम्यान त्यांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. त्यानंतर बराच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावर पोलिसांनी गोडबोले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची अडवणूक करत सरकारी कामात अडथळा आणला. त्यामुळे मौदा पोलिसांनी भांदवि कलम 353 अंतर्गत गोडबोलेंसह त्यांच्या 10 सहकाऱ्यांना अटक केली आहे.
कोण आहेत देवेंद्र गोडबोले?
देवेंद्र गोडबोले हे नागपूर ग्रामीणचे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत. यापूर्वी देखील त्यांच्या विरोधात मौदा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविले आहेत. ज्यामध्ये मौदा परिसरात दंगल पसरविणे, गैरकायद्याची मंडळी गोळा करणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे आदी कारणांमुळे गोडबोले यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्याअंतर्गत त्यांना अटकही करण्यात आली. सोबतच त्यांना यापूर्वी एक वर्षासाठी नागपूर शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी दिले होते.
इतर महत्वाच्या बातम्या