Nagpur : रामभक्तांसाठी आनंददायी बातमी, रामटेक येथील अंबाळा तलावसह राज्यातील 73 तीर्थस्थळांचा होणार कायापालट
Nagpur Ramtek Ambala Lake Development : रामटेक गडमंदिर आणि त्या परिसरात इतिहासाच्या खानाखुणा आजही बघायला मिळतात. त्या ठिकाणी असलेल्या अंबाळा तलावाचा विकास करण्यात येणार आहे.
नागपूर : तमाम देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील राम ( Ayodhya Ram Mandir) मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील भाविकांना शासनाने आणखी एक आनंदायी बातमी दिली आहे. नागपुरातील रामटेक येथील अंबाळा तलाव (Nagpur Ramtek Ambala Lake) आणि परिसरातील पुरातन वास्तूंचा कायापालट करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त राज्य शासनाने ‘नमो तीर्थस्थळ सुधार अभियान’ हाती घेतले आहे. या अभियाना अंतर्गत देशासह राज्यातील तीर्थस्थळांना नवी झळाळी मिळणार आहे. त्यातच राज्यातील 73 तीर्थस्थळांचा जीर्णोद्धार केला जात आहे. यामध्ये प्रभु श्रीराम वनवासात असतांना काही काळ रामटेक येथे विश्रांती घेतली अशी अख्यायिका असलेल्या नागपूर जिल्हातील रामटेक येथील अंबाळा तलाव आणि परिसरातील पुरातन वास्तूंचा देखील समावेश आहे.
अंबाळा तलावाचे आध्यात्मिक,सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व
नागपूर शहरापासून ( Nagpur) सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या रामटेक या शहराला फार असा प्राचीन इतिहासासह अध्यात्मिक महत्व देखील लाभले आहे. रामटेक गडमंदिर आणि त्या परीघात मोठ्या प्रमाणात इतिहासाच्या खानाखुणा आजही बघायला मिळतात. त्यातील एक म्हणजे या परिसरात असलेला अंबाळा तलाव हा होय. हा परिसर निसर्गरम्य वातावरणात असून तलावाच्या शेजारी काही ऐतिहासिक स्मारके आढळतात. या वास्तूची निर्मिती नागपूरकर भोसल्याच्या काळात झाली असल्याचे सांगण्यात येते.
एका आख्यायिकेनुसार भगवान नरसिंह आणि हिरण्यकश्यपू यांच्यात झालेले युद्ध हे याच अंबाळा तलाव परिसरात झाल्याचे सांगितले जात.आजही या तलावाच्या परिसरात अध्यात्मिक पूजा विधी सारखे कार्यक्रम केले जात असून कायम लोकांचा राबता या ठिकाणी बघायला मिळतो. अंबाळा तलावाजवळील वास्तूंना सांस्कृतिक दृष्टीकोनासह आध्यात्मिक दृष्ट्यासुद्धा या स्थळांना अन्यानंसाधारण महत्त्व आहे. या जीर्णोद्धारामुळे त्यांच्या संवर्धनासाठी मोठी मदत होणार आहे.
73 तीर्थस्थळांना मिळणार नव्याने झळाळी
राज्यातील सुमारे 73 तीर्थस्थळांमध्ये ऐतिहासिक व पुरातन मंदिरासह बाराव, तलाव, स्मारकांचा समावेश केला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या पुरातत्त्व आणि वस्तू संग्रहालये संचालनालया मार्फत हे अभियान हाती घेण्यात आले आहे. यात रामटेक येथील या परिसराचा देखील समावेश आहे. संचालनालयाच्या अखत्यारित येणाऱ्या नागपूर विभागातील 9 तीर्थस्थळांचा समावेश असेल, तर विदर्भातील सर्वाधीक स्थळ चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. तसेच राज्यातील सर्वाधीक 17 वास्तू ह्या एकट्या नाशिक विभागातील असून नियमीत योजना, जिल्हा वार्षिक योजना आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत यासाठी निधी मंजूर केला जाणार आहे.
नागपूर विभागातील या 9 वास्तूंचा समावेश
या अभियानात नागपूर जिल्ह्यातील 9 ऐतिहासिक व पुरातन वास्तूंचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये अंबाळा तलाव परिसरातील मंदिरे, (ता. रामटेक, जि. नागपूर) कालभैरव मंदिर, नागरा (ता. जि. गोंदिया) महादेव मंदिर, भटाळा (ता. राजुरा, जि. चंद्रपूर) विष्णू मंदिर, माणिकगड (ता. जिवती, जि. चंद्रपूर) भवानी मंदिर, भटाळा (ता. राजुरा, जि. चंद्रपूर) ॠषी तलाव भटाळा (जि. चंद्रपूर) महादेव मंदिर, बाबुपेठ, चंद्रपूर सोमेश्वर मंदिर, राजुरा (ता. राजुरा, जि.चंद्रपूर) शंकर मंदिर, भिसी (चिमूर, जि. चंद्रपूर) इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.
पर्यटनासह ऐतिहासिक व पुरातन वास्तूंचे होईल संवर्धन
राज्य शासनाच्या ‘नमो तीर्थस्थळ सुधार अभियान’या अभियानामुळे या वारसास्थळांना नव्याने झळाळी मिळणार असून पर्यटन वाढीसाठी देखील मोठी मदत होणार आहे. या 73 तीर्थस्थळांमध्ये ऐतिहासिक व पुरातन मंदिरांसह बारव, तलाव, स्मारकांचा देखील समावेश आहे. तसेच, डिजिटल दर्शन, परिसर सुशोभीकरण व स्वच्छता या बाबीचासुद्धा या कामात अंतर्भाव असणार आहे.यामुळे पर्यटनाच्या आणि भाविकांच्या दृष्टीने हे महत्वपूर्ण पाऊल म्हटल्या जात आहे. शिवाय या अभियानामुळे ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूंचे जतन, संवर्धन आणि संगोपनासाठी मोठी मदत होणार आहे.
ही बातमी वाचा: