Nagpur Bird Flu : नागपुरात बर्ड फ्लूचा उद्रेकामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू; पशू संवर्धन विभाग अलर्ट मोडवर
नागपुरात बर्ड फ्लूचा संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्येच बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसात रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झालाय.
नागपूर: नागपूरातील राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात हजारो कोंबड्याना बर्ड फ्लूचे (Bird Flu) संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्म मध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसात रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर पशू संवर्धन विभाग अलर्ट मोडवर आली असून या संबंधित योग्यती काळजी पशू संवर्धन विभागाच्या (Nagpur News)वतीने घेण्यात येत आहे. नियमानुसार संबंधित पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र, तर दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू
गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममध्ये दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. त्यानंतर पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे, हे तपासण्यासाठी आजारी कोंबड्यांचे नमुने पुण्याच्या आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यानंतर चार मार्च रोजी आलेल्या अहवालात कोंबड्यांना बर्ड फ्लूची म्हणजेच एवियन इन्फ्लुएंजाची लागण झाल्याचे सिद्ध झाले. नागपूरच्या जिल्हा परिषद संवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक यांनी प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र मधील पोल्ट्री फार्म मध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याचे मान्य केले आहे. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता योग्यती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
पशू संवर्धन विभाग अलर्ट मोडवर
शासनाने संबंधित पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्भव झाल्यानंतर पाळावयाच्या सर्व नियमांचे पालन करत कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा केला आहे. राज्य सरकारच्या ज्या पोल्ट्री फार्म मध्ये बर्ड फ्लू चा उद्रेक झाला, त्याच्या एक किमीच्या परिघात पशु वैद्यकीय विद्यापीठाचा ही पोल्ट्री फार्म असून तिथल्या 260 कोंबड्याना ही मारण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र व्यतिरिक्त नागपूर जिल्ह्यातील इतर कुठल्याही पोल्ट्री फार्म वर सध्या बर्ड फ्लू चा संक्रमण झाल्याची माहिती समोर आलेली नाही, असा दावाही जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या