नागपुरातील 580 शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गंभीर दखल; कसून चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश
Nagpur Teacher Scam: नागपुरातील 580 शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या घोटाळ्याची कसून चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे.

Nagpur Bogus Teacher Scam : राज्याची उपराजधानी नागपुरातील 580 शिक्षक भरती घोटाळ्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्त (Bogus Teacher Appointment) करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. सोबतच या बोगस नियुक्ती आणि वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना लावण्यात आल्याचे समोर आले असून हे खुद्द शिक्षण विभागाने हे त्यांच्या एका आदेशात मान्य केले आहे. दुसरीकडे, याच मुद्द्याला घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या घोटाळ्याची कसून चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे.
दोषी आढळ्यास बोगस शिक्षकांकडून वेतन परत घेण्याचे संकेत
शिक्षक भरती घोटाळ्यात कोणत्याही दोषीला न सोडण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. शिवाय दोषी आढळ्यास बोगस शिक्षकांकडून वेतन परत घेण्याचे संकेतही त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये
नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली असून प्रशासनाला कारवाईचे सक्त आदेश देण्यात आले आहे. बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करुन सरकराला कोट्यवधीची चुना लावण्यात आल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणी एकट्या नागपूर विभागात झालेल्या 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. तर प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे बोगस शिक्षकांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्याच्या नोंदीही आता पोलीस तपासणार असल्याची माहिती आहे.
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी नवीन तक्रार
बनावट कागदपत्रांच्या आधारे अपात्र शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता देणे आणि शालार्थ ‘आयडी’ तयार करण्याच्या प्रकरणात सदर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री नवी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांनी २०२२-२३ मध्ये भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील एका शाळेतील दोन शिक्षकांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शिक्षण संस्थाचालक, उपसंचालक आणि उपसंचालक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार करून या नियुक्त्या देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. नवप्रभात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामलाल चौधरी आणि कार्याध्यक्ष हेमंत बांडेबुचे यांनी ही तक्रार दिली. संस्थेचे माजी अध्यक्ष कल्याण डोंगरे, तत्कालीन सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कमल कटारे आणि उपसंचालक जामदार यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI























