ST Bus : नागपूर विभागातून 66 'दिवाळी स्पेशल' एसटी, प्रवाशांना 10 टक्के हंगामी भाडेवाढचा फटका
सणासुदीदरम्यान नागपूरहून पुणे, औरंगाबाद, गोंदिया, पुसद या मार्गावर प्रवासीसंख्या अधिक असल्याने या स्पेशल गाड्या मुख्यतः या मार्गांवर चालविण्यात येणार आहे.
Nagpur News : दिवाळीच्या हंगामात प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळ नागपूर विभागातून 66 दिवाळी स्पेशल अतिरिक्त गाड्या सोडणार आहे. 18 ऑक्टोबर 31 ऑक्टोबर दरम्यान या विशेष गाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती नागपूर विभागाचे विभाग नियंत्रक किशोर आदमने यांनी दिली. सणासुदीदरम्यान नागपूरहून पुणे, औरंगाबाद, गोंदिया, पुसद या मार्गावर प्रवासीसंख्या अधिक असल्याने या स्पेशल गाड्या मुख्यतः या मार्गांवर चालविण्यात येणार आहे. मात्र यासोबतच महसुल वाढीच्या दृष्टीने एसटी महामंडळाने 10 टक्के भाडेवाढीचा फटकाही प्रवाशांना बसणार आहे.
मुख्यत: 20 व 21 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12नंतर प्रवास सुरु करणाऱ्या प्रवाशांना सुधारित 10 टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल. ही भाडेवाड 31 ऑक्टोबर पर्यत राहाणार आहे. सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहाणार असल्याची माहिती आहे. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाढ लागू राहणार नाही. मात्र नागपूर विभागात एकही शिवनेरी किंवा अश्वमेध बस नसल्याने याचा फायदा नागपूर विभागातील प्रवाशांना मिळणार नाही.
1 नोव्हेंबर रोजी भाडेवाढ संपुष्टात
गणेशपेठच्या आरक्षण केंद्रातून यापूर्वी ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे , त्या प्रवाशाकडून वाहकाव्दारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. तथापी, ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विदयार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. 1 नोव्हेंबर पासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमी प्रमाणे तिकीट दर आकारले जाणार आहे.
'दिवाळी स्पेशल' धावणार
एसटी महामंडळाकडून साधारणपणे 5 ते 75 रुपयांपर्यंत भाडेवाढ होणार आहे. साधी गाडी, निमआराम, शिवशाही आणि स्लीपर गाड्यांना ही भाडेवाढ लागू असेल. दिवाळीत प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून एसटी महामंडळ जादा गाड्या सोडणार आहे. दिवाळी दरम्यान येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता कुटुंबिय आणि मित्र परिवारासह पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा 'दिवाळी स्पेशल' जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बसगाड्या नागपूर विभागातून 18 ते 31 ऑक्टोबर दरम्यान धावणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या