Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Nagpur Ramzula Mercedes Car Accident : मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोघांचा बळी घेणाऱ्या रितिका ऊर्फ रितू मालूचा जामीन रद्द करण्यात आला आहे.
नागपूर : रामझुला रेल्वे ओव्हर ब्रीजवरील मर्सडिज कार अपघात प्रकरणी (Nagpur Accident) मोठी अपडेट समोर येत आहे. मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोघांचा बळी घेणाऱ्या रितिका ऊर्फ रितू मालूचा (Ritika Malu) जामीन रद्द करण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने (Court) याबाबत अंतिम लेखी आदेश दिला आहे.
रितिका मालूने 25 फेब्रुवारी 2024 च्या मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात मर्सिडिज कारने दोन युवकांना धडक दिली. यात दोन्ही युवकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सुरुवातीला, तहसील पोलिसांनी 25 फेब्रुवारी 2024 रोजी मालूच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता आणि त्याच दिवशी तिला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी जामीन मंजूर केला होता.
रितिका मालूचा जामीन अखेर रद्द
आता आरोपी कार चालक महिला रितिका मालू हीचा जामीन अखेर रद्द करण्यात आला आहे. न्यायाधीश आर. एस. पाटील (भोसले) यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी झाली. न्यायालयाकडून रीतिकाला अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
नागपुरातील रामझुला रेल्वे ओव्हर ब्रीजवर अपघाताची ही घटना तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच 25 फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती. रितू मालू आणि त्यांची मैत्रीण सीपी क्लबमध्ये गेल्या होत्या. तिथून दोघी मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान मर्सिडीज कारने घरी परतत असताना रामझुल्यावर रितिका यांनी कारचा वेग वाढविला आणि समोर दुचाकीवर जाणाऱ्या दोन तरुणांना जोरदार धडक दिली होती. यात मोहम्मद हुसेन आणि मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया यांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताचा सखोल तपास करत असताना नागपूर पोलिसांना सढळ पुरावे हाती लागले होते. त्यामुळे हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी रितिका मालूच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला होता.
सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणात रितिका मालू यांचा अटकपूर्व जामीन आधी जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. तर यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही त्या संदर्भात दिलासा देण्यास नकार दिला होता. आता जिल्हा सत्र न्यायालयाने अंतिम लेखी आदेश काढत रितू मालूचा जामीन रद्द केला आहे. तसेच रितू मालूला अटक करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
आणखी वाचा