ठाण्याच्या महापौरांना दाऊद आणि छोटा शकीलच्या नावाने धमकवणाऱ्याला अटक
चोरीचा मोबाईल विकत घ्यायचे आणि इंटरनेटवरुन विविध क्रमांक मिळवून कुणालाही त्रास द्यायचे प्रताप आरोपी करत असल्याचे उघड झालं आहे. तरीही, या प्रकरणाची सायबर तज्ज्ञांकडून अधिक चौकशी सुरु आहे.
ठाणे : ठाण्याचे महापौर मिनाक्षी शिंदे यांना दाऊद आणि छोटा शकीलच्या नावाने धमकवणाऱ्या युवकाला ठाणे खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. 28 वर्षीय वसीम मुल्ला असं धमकी देणाऱ्या तरुणाचं नाव असून तो मुंब्रा परिसरात राहतो. इंटरनेटवरुन नगरसेवकांचे नाव आणि नंबर काढून हा युवक धमकी देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आतापर्यंत त्याने पाच नगरसेवक आणि पोलिसांना धमकी दिली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मुंब्रा परिसरात राहणारी महिला तरन्नुम कुरेशी यांचा मोबाईल त्यांच्या मोलकरणीने काही महिन्यांपूर्वी चोरला होता. अकबरअली डावरी असं मोलकरणीचे नाव असून या मोलकरणीनेच हा मोबाईल या युवकाला विकला होता. ज्या नंबरने महापौर मिनाक्षी शिंदे यांना धमकावण्यात आलं होतं, त्या नंबरचा शोध लागल्याने कुरेशी यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली. त्यानंतर हा मोबाईल काही महिन्यांपूर्वी चोरीला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
मोलकरणीला ताब्यात घेतल्यानंतर मोबाईल या युवकाला विकला असल्याची कबुली दिल्यानंतर आरोपीपर्यंत पोलीस पोहचले. अटक करण्यात आलेला आरोपी यापूर्वी सौदीमध्ये लेबर म्हणून काम करत होता. सध्या तो क्षयरोगाने ग्रस्त असल्याने त्याला कुणीही नोकरी देत नाही. या युवकाची मानसिकता देखील ठीक नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यासंदर्भात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती ठाणे पोलीस गुन्हे शाखाचे उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.
मुंब्रा, अमृतनगरमधून मुल्ला याला अटक केली. त्याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीच संबंध नसल्याची बाब प्राथमिक तपासात समोर आली आहे. चोरीचा मोबाईल विकत घ्यायचे आणि इंटरनेटवरुन विविध क्रमांक मिळवून कुणालाही त्रास द्यायचे प्रताप तो करत असल्याचे उघड झालं आहे. तरीही, या प्रकरणाची सायबर तज्ज्ञांकडून चौकशी सुरु असून शनिवारी मुल्ला याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्तांनी दिली.