(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Politics: शिवसेना आणि काँग्रेसकडून आमदारांना व्हीप, महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय?
पावसाळी अधिवेशन दोन दिवसावर आलं असताना शिवसेना आणि काँग्रेसने आपल्या आमदारांना व्हीप बजावून हजेरी लावण्याच्या सूचना केल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई : पावसाळी अधिवेशन दोन दिवसावर आलं असताना शिवसेना आणि काँग्रेसने आपल्या आमदारांना व्हीप बजावून अधिवेशनात हजेरी लावण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे तर काँग्रेसच्या आमदारांनाही सूचना दिल्या गेल्या आहेत दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीत गाठीभेटी सुरु आहेत. पावसाळी अधिवेशन दोन दिवसावर आलं असताना महाराष्ट्रात या महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत.
पावसाळी अधिवेशनात महत्त्वपूर्ण विधेयकं मंजूर करायची आहेत. शिवाय विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आग्रही आहे. त्यामुळे अधिवेशनात दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेना आणि काँग्रेसने आपल्या आमदारांना व्हीप बजावला आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवड याच अधिवेशनात होईल असा दावा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
राजकीय भेटीगाठींचा सिलसिला वाढला
गेल्या आठ दिवसात महाराष्ट्रात राजकीय भेटीगाठींचा सिलसिला वाढला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आठवड्यात दोन वेळेला महत्त्वपूर्ण भेट झाली. संजय राऊत मातोश्री आणि वर्षावर फेऱ्या मारत आहेत. महाविकास आघाडीच्या समन्वय पक्षाची आठवड्यात तीन वेळेला बैठक झाली. तर देवेंद्र फडणवीस यांनी थेट दिल्ली गाठत अमित शाहांसह भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणनीती महाविकास आघाडीकडून ठरवली जात आहे. यात दगाफटका होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
इकडे भाजपच्या गोटातही हालचाली सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून रोजी थेट दिल्ली गाठली आणि भेटीगाठी केल्या. फडणवीसांनी अमित शाह यांच्या घरी जाऊन वीस ते पंचवीस मिनिट चर्चा केल्याची माहिती आहे. एकीकडे दिल्लीत या घडामोडी सुरू असताना केंद्रीय यंत्रणांकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.
ईडीनं अनिल देशमुख यांच्या घराची झाडाझडती घेतली. अनिल देशमुख यांना तिसऱ्यांदा समन्स पाठवलं. देशमुखांना कुठल्याही क्षणी ईडीसमोर हजेरी लावावी लागू शकते. अजित पवार यांच्या संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने धाड टाकली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब, किशोरी पेडणेकर आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.