Monsoon Update : मुंबईत मान्सून कधी दाखल होणार? भारतीय हवामान विभागानं दिली महत्त्वाची माहिती, जाणून घ्या
Monsoon Update : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मान्सून जून महिन्यात कधी दाखल होणार याबाबत भारतीय हवामान विभागानं माहिती दिली आहे.
मुंबई : नैऋत्य मान्सून (South West Monsoon) केरळमध्ये 31 मे पर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं (IMD)वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्यावतीनं मुंबईत मान्सून (Monsoon Arrival In Mumbai) 10 ते 11 जूनपर्यंत पोहोचू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी ज्या प्रमाणं मान्सून मुंबईत पोहोचतो त्यानुसार यंदा देखील त्याचं दरम्यान यावेळी आगमन होऊ शकतं.
भारतीय हवामान विभागाच्या वतीनं शास्त्रज्ञांकडून केरळमधील मान्सूनच्या आगमनानंतरच्या घडामोडींचा अभ्यास केला जाईल. तोपर्यंत अधिकृतरित्या मान्सूनच्या मुंबईतील आगमनाची निश्चित तारीख सांगण्यात आलेली नाही. 10 जून पर्यंत मान्सूनचं आगमन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागानं मान्सून 19 मे 2024 पर्यंत मालदीव, कोमोरिन, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्र येथे मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती दिलेली होती.
मुंबईत मान्सूनचं आगमन कधी होणार?
हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार जर मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असला तरी मुंबईत मान्सूनचं आगमन होण्यासाठी 10 -11 जूनची वाट पाहावावी लागेल, असं म्हटलं.
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना मान्सून अंदमानमध्ये दाखल झालेला आहे. केरळमध्ये 31 मे पर्यंत मान्सून पोहोचेल. त्यानंतर मुंबईत पोहोचण्यासाठी 10 ते 11 जूनपर्यंत वाट पाहावी लागेल, असं त्यांनी म्हटलं. यामध्ये तीन ते चार दिवसांचा फरक राहू शकतो, असंही ते म्हणाले.
केरळमध्ये मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यानंतर हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुंबईतील आगमनाची निश्चित तारीख जाहीर करु, असं देखील हवामान विभागाच्यावतीनं सांगण्यात आलं. 2023 मध्ये मान्सूनचं आगमन उशिरानं झालं होतं. जवळपास दोन आठवडे उशिरानं मान्सून दाखल झाला होता. बिपरजॉय चक्रीवादळामुळं मान्सूनच्या आगमनावर परिणाम झाला होता.
मुंबईत मान्सूनचं आगमन जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असली तरी हवामान अभ्यासकांनी मान्सूनपूर्व पाऊस मुंबईसह राज्यातील विविध भागात हजेरी लावू शकतो असा अंदाज वर्तवला आहे.
यंदा मान्सूनचा पाऊस सामान्य राहील, असा अंदाज देखील भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. सरासरीच्या 106 टक्के मान्सूनचा पाऊस झाल्यास तो सामान्य मानला जातो.
दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सातारा, सिंधुदुर्ग, अहमदनगर या जिल्ह्यांसह राज्यातील विविध भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे.
संबंधित बातम्या :