विधानपरिषदेच्या उपसभापतींची नियुक्ती लवकरच, नियुक्ती बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे डावपेच
शिवसेनेला उपसभापती पद देऊन राज्यसभेतील उपाध्यक्ष पदाची नाराजी दूर करण्यात भाजपला मदत होईल, तर काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदही मिळेल. या गोष्टी पाहता मुख्यमंत्र्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आता रंगताना पाहायला मिळत आहे.
मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापतींची नियुक्ती लवकरच होण्याची शक्यता आहे. उद्या उपसभापतींच्या नियुक्तीसाठी कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. या पदासाठी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसभापतींची नियुक्ती बिनविरोध होण्यासाठी डावपेच आखले आहेत.
उपसभापती पदासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडल्यास विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा करु, अशी अट मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसमोर ठेवल्याचं समजत आहे. त्यामुळे उद्या विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक जाहीर होताच, विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्तीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेला उपसभापती पद देऊन राज्यसभेतील उपाध्यक्ष पदाची नाराजी दूर करण्यात भाजपला मदत होईल, तर काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदही मिळेल. या गोष्टी पाहता मुख्यमंत्र्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आता रंगताना पाहायला मिळत आहे.
भाजप-शिवसेनेने आधीच व्हीप काढला आहे तर विररोधकांनी उद्या विधानभवनात सकाळी 10 वाजता स्वतंत्र आणि मग एकत्र बैठक बोलावली आहे.
विधानपरिषदेत सध्याची पक्षीय बलाबल
भाजप : 23 शिवसेना : 12 राष्ट्रवादी काँग्रेस : 17 काँग्रेस : 16 लोकभारती : 1 शेकाप : 1 रासप : 1 पीआरपी(कवाडे गट) : 1 अपक्ष : 6