Panju Island : धावत्या लोकलमधून नारळ फेकला, रेल्वे ट्रॅकवरुन जाणारा तरुण गंभीर जखमी
Mumbai Local News : हवामान खराब असल्याने पाणजू गावातून भाईंदरकडे जाणाऱ्या बोटी बंद होत्या. त्यामुळे संजय भोईर हा तरुण ट्रॅकवरून चालत जात असताना त्याच्या डोक्याला नारळ लागला.

ठाणे : धावत्या लोकलमधून (Mumbai Local) नारळ फेकल्याने एका तरुणाच्या डोक्याला मार लागून तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला सध्या मुंबईच्या नायर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. ही घटना शनिवारी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान भाईंदर नायगाव रेल्वे स्टेशनवरील, भाईंदर रेल्वे खाडी ब्रीजवर घडली आहे. जखमी तरुण पाणजू या बेटावर (Panju Island) राहतो.
नायगांवच्या पाणूज बेटावर राहणारा संजय दत्ताराम भोईर हा 25 वर्षीय युवक घरातून शनिवारी सकाळी 8.30 दरम्यान कामाला जाण्यासाठी निघाला. पाणजू हे गाव समुद्राच्या मध्यभागी आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना शहरात जाण्यासाठी बोटीची मदत घ्यावी लागते.
Mumbai Local News : धावत्या लोकलमधून नारळ फेकला
शनिवारी हवामान खराब असल्याने बोटी बंद होत्या. त्यामुळे संजयने मुंबईला कामावर जाण्यासाठी नायगांव भाईंदर रेल्वे स्टेशनमधील भाईंदर खाडीवरील ब्रीजवरुन नायगाव स्टेशन गाठण्याच ठरवलं. ब्रीजवरुन चालत असताना, चालू लोकलमधून एका प्रवाशाने निर्माल्य खाडीत फेकण्याच्या उद्देशाने नारळ फेकला. तोच नारळ संजयच्या डोक्याला लागला.
Panju Gaon News : संजय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला
नारळाच्या जबरदस्त माऱ्यामुळे संजय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ब्रीजवरील इतर प्रवाशांनी संजयला पाहिल्यावर त्याच्या घरच्यांना बोलावलं. संजयच्या घरच्यांनी त्याला प्रथम पालिकेच्या रुग्णालयात नेलं. तिथून त्याला वसईच्या प्लॅटिनियम रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर सायंकाळी त्याला मुंबईच्या नायर रुग्णालयात हलवण्यात आलं.
Mumbai Accident News : प्रकृत्ती सध्या चिंताजनक
संजय गोरेगावला एका खाजगी कंपनीत काम करतो. बोटी बंद झाल्यावर तेथील नागरीकांना या ब्रीजवरुन जीवघेणा प्रवास करावा लागतो. आतापर्यंत या गावातील किमान अशा प्रकारच्या 10 ते 12 घटना घडल्या असल्याची माहिती गावच्या सरपंचांनी दिली. संजयच्या डोक्यातून रक्तस्त्राव प्रचंड झाल्याने, त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
पाणजू गावच्या सरपंच हेमांगी भोईर म्हणाल्या की, धावत्या ट्रेनमधून निर्माल्य टाकण्याची प्रथा बंद व्हावी. त्यामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. धावत्या ट्रेनमधून निर्माल्य टाकू नये, त्यामुळे जीवित हानी होते अशी घोषणा भाईंदर वरून जाणाऱ्या ट्रेनमधून करण्यात यावी.
होडी बंद असल्याने आम्हाला रेल्वे ट्रॅकवरून जावं लागतं. पाणजू हे अतिदुर्गम बेट असल्याने होडी हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला एक पायवाट जरी करून दिली तरी आम्ही त्यांचे आभारी राहू असं सरपंच हेमांगी भोईर म्हणाल्या.
ही बातमी वाचा:
























