(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vasai News : वसई किल्ल्यात हौशी पर्यटकाचा उन्माद, व्हिडीओच्या नादात किल्ल्यातील चर्चमध्ये लावली आग
वसई किल्ल्यातील एका चर्चमध्ये चक्क एका तरुणाने रिल्स बनविण्यासाठी किल्ल्यात आग लावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे येथील किल्ल्यातील वास्तूंची या तरुणांमार्फत विटंबना झाली असल्याचा आरोप दुर्गप्रेमींनी केला आहे.
वसई : वसई किल्ल्यावर (Vasai News) आलेल्या एका हौशी पर्यटकाने इंस्टाग्रामवर व्हिडीओ बनवण्याच्या नादात थेट किल्ल्यातील एका चर्चमध्येच आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान या घटनेमुळे किल्ल्याची विटंबना झाल्याचा आरोप दुर्गप्रेमींनी केलाय. दरम्यान याप्रकरणी इतिहास अभ्यासक आणि किल्ले वसई मोहिमेचे संस्था प्रमुख श्रीदत्त राऊत यांनी पुरातत्व विभागाकडे या संदर्भात तक्रार दाखल केली असून या तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय आहे
वसईच्या किल्ल्याला ऐतिहासिक तसेच, पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. या किल्ल्यात बालेकिल्ला, सात विविध चर्च, साखर कारखाना, प्रवेशद्वार, पुरातन मंदिर अशा अनेक वास्तू आहेत. मात्र सध्या यातील अनेक वास्तूंची पडझड होत आहे. तर दुसरीकडे येथील स्थानिकांमार्फत आणि काही हौशी पर्यटकांमार्फत या किल्ल्याची नासधूस देखील होत आहे. येथे येणाऱ्या हौशी पर्यटकांमार्फत किल्ल्यात कोणत्याही कडेवर उभे राहून व्हिडीओ काढणे, फोटो काढणे या सारखे प्रकार घडत आहेत. तर प्री वेडिंग शूट तर सर्रास सुरु आहे. त्यातच आता इंस्टाग्रामवर व्हिडीओ बनवून लाईक्स मिळवणाऱ्या तरुणांची भर पडली आहे.
वसई किल्ल्यातील एका चर्चमध्ये चक्क एका तरुणाने रिल्स बनविण्यासाठी किल्ल्यात आग लावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे येथील किल्ल्यातील वास्तूंची या तरुणांमार्फत विटंबना झाली असल्याचा आरोप दुर्गप्रेमींनी केला आहे. किल्ल्यात आग लावल्याने येथील पुरातत्व विभागाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत इतिहास अभ्यासक आणि किल्ले वसई मोहिमेचे संस्था प्रमुख श्रीदत्त राऊत यांनी पुरातत्व विभागाकडे इमेलद्वारे तात्काळ तक्रार केली आहे. या तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याआधी देखील किल्ल्यातील विविध घटनांबाबत तक्रार केली असता पुरातत्व विभागाकडे कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. किल्ल्यात मुख्य दरवाजा लावण्याची मागणी त्यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा केली आहे. तसेच या तरुणावर कारवाई करण्याची मागणी देखील आता दुर्गप्रेमीकडून होत आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मार्फत 288 स्मारके राष्ट्रीय महत्वाची म्हणून जतन
ऐतिहासिक व पुरातन स्मारकांपैकी केंद्र सरकारद्वारा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मार्फत 288 स्मारके राष्ट्रीय महत्वाची म्हणून जतन केली आहेत. तसेच, महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयमार्फत 387 स्मारके संरक्षित म्हणून घोषित केलेली आहेत. यामध्ये घटोत्कच व धाराशीव ही लेणी, राजगड, सिंहगड, माणिकगड यांच्यासारखे किल्ले तसेच गड जेजूरी, निरानृसिंहपूर, श्री तुळजाभवानी यांसारखी मंदिरे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी महापुरुषांची जन्मस्थळे व गेट वे ऑफ इंडिया अशा स्मारकांचा समावेश आहे.
हे ही वाचा :