(Source: ECI/ABP News/ABP Majha)
16 शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! 20 वर्ष शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना कामावरून काढलं
उल्हासनगर येथील शाळा प्रशासनाने लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याचे कारण देत 16 शिक्षकांना कामावरुन कमी केल्याची घटना घडली आहे.
उल्हासनगर : लॉकडाऊनमध्ये अनेक जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शिक्षक देखील या दृष्टचक्रातून वाचू शकले नाहीत. लॉकडाऊनमुळे नागरिक आर्थिक संकटात असल्याने आपल्या पाल्यांची फी कशी भरायची अशी चिंता त्यांच्यासमोर आहे. तर दुसरीकडे ऑनलाइन लेक्चर सुरू असले तरी शाळेत फी जमा होत नसल्याने आता शिक्षणाचा गाडा कसा चालवायचा असा प्रश्न शाळा प्रशासनासमोर आहे. याच विवंचनेतून आता शाळेने 16 शिक्षकांसह 2 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे.
याबाबत शाळा प्रशासनाला विचारले असता गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. या शिक्षिका नर्सरी ते चौथीच्या वर्गाच्या आहेत, हे सर्व वर्ग विनाअनुदानित आहेत. मात्र, आम्ही त्यांना वर्षभर पगार दिलाय. आता देखील त्यांना टर्मिनेट केलं नसून रित्रीचमेंट केलंय. शाळा सुरू झाल्यानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात येईल. त्यांची नियमानुसार सर्व देयकं देण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण शाळा प्रशासनाने दिलं.
उल्हासनगर येथील सेवा सदन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इरा पूर्व प्राथमिक विद्यालय, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कार्यरत असलेल्या 16 शिक्षक, 2 शिक्षतेतर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. तब्बल 20 हुन अधिक वर्ष शाळेत काम केलंय, लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन लेक्चर, विद्यार्थ्यांचे रिझल्ट बनवले. मात्र, शाळा प्रशासनाने शिक्षकांची एक झूम मिटिंग घेऊन तासाभरात घरचा रस्ता दाखवल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केलीय. वर्षभरापासून शाळेत नवीन प्रवेश होत नाही, विद्यार्थ्यांची फी येत नाही. त्यामुळे पगार देऊ शकत नसल्याने कामावरून काढल्याचं कारण शाळा प्रशासनाने दिल्याचं शिक्षकांनी सांगितलंय.
दरम्यान याबाबत शाळा प्रशासनाने गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. या शिक्षिका नर्सरी ते चौथीच्या वर्गाच्या आहेत, हे सर्व वर्ग विनाअनुदानित आहेत. मात्र, आम्ही त्यांना वर्षभर पगार दिलाय. आता देखील त्यांना टर्मिनेट केलं नसून रित्रीचमेंट केलंय. शाळा सुरू झाल्यानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात येईल त्यांची नियमानुसार सर्व देयकं देण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण दिलंय. मात्र, कॅमरासमोर बोलण्यास नकार दिला. शाळा प्रशासनाने त्यांची देयक दिली असली तरी भविष्यात उदरनिर्वाहाचा प्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे. शिक्षकांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळासह शिक्षण मंत्र्यांना देखील न्यायासाठी साकडे घातलंय.
या शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी शिक्षक परिषद या शिक्षकांच्या मदतीला धावून आली आहे. या शिक्षकांवर अन्याय झाला असून त्यांना न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा शिक्षक परिषदेने दिलाय. भाजपसुद्धा या शिक्षकांच्या मागे उभी असून राज्य सरकारने या शिक्षकांना न्याय दिला नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू असं भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी म्हटलंय.