देशभक्त सोनम वांगचुक यांना अटक करताय आणि पाकिस्तानसोबत निर्लज्जासारखी मॅच खेळताय, हीच का तुमची देशभक्ती? उद्धव ठाकरेंचा सवाल
Marathwada Flood : भाजपने पंतप्रधान मोदींच्या नावे असलेल्या पीएम केअर फंडातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी 50 हजार कोटी रुपये मदत करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

मुंबई : जो व्यक्ती देशाच्या लष्करासाठी संशोधन करतोय, अनेक नवे शोध लावतोय त्या सोनम वांगचूकला (Sonam Wangchuck) अटक करताय आणि ज्या पाकिस्तानने भारतावर हल्ला केला त्याच्यासोबत अजूनही निर्लज्जासारखं क्रिकेट खेळताय, हीच का तुमची देशभक्ती? असा करडा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला विचारला. देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) अंगलट कोणतीही गोष्ट आली तर ते त्या विषयाला फाटे फोडतात असं म्हणत त्यांनी फडणवीसांवरही टीका केली. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधानांनी पीएम केअर फंडातून (PM Care Fund) 50 हजार कोटींची मदत करावी अशी मागणी त्यांनी केली.
लेहमध्ये झालेल्या आंदोलनाला सोनम वांगचूक हेच कारणीभूत असल्याचा आणि त्यांनीच आंदोलकांना फूस दिल्याचा आरोप गृहमंत्रालयाने केला आहे. गृहमंत्रालयाचे आरोप सोनम वांगचूक यांनी फेटाळले आहेत. मागच्या निवडणुकीत दिलेला शब्द केंद्र सरकारने पाळला नाही अशी टीका वांगचूक यांनी केली. त्यानंतर सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. यावरून उद्धव ठाकरेंनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.
Uddhav Thackeray On Ind Vs Pak : पाकिस्तानसोबतच्या सामन्यावर बहिष्कार टाका
सोनम वांगचूक यांनी लडाखमध्ये मायनस डिग्री सेल्सियसमध्ये काम करणाऱ्या भारतीय लष्करासाठी संशोधन करून त्यांचे काम सुलभ केलं आहे. वांगचूक यांनी अनेक शोध लावले आहेत. पण त्यांना रासुका लावून अटक केली. पण ज्या पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, त्यांच्यासोबतच क्रिकेट खेळताय? उद्याच्या सामन्यावर बहिष्कार टाका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
मराठवाड्यातील पूरपरिस्थितीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मराठवाड्यातील शेती उद्ध्वस्त झाली आहे. त्यांना जर भरपाई दिली नाही तर शेतकरी संपेल. त्यामुळे हीच खरी वेळ आहे, शेतकऱ्याला कर्जाच्या डोंगरातून काढायची. राज्य सरकारने राज्याचे विशेष अधिवेशन बोलवावं आणि शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी."
पीएम केअर फंडामध्ये महाराष्ट्रातून मोठा निधी जातो. पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहेत, त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी पीएम केअर फंडातून 50 हजार कोटींची मदत जाहीर करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : अंगलट आल्यानंतर फडणवीस फाटे फोडतात
राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी पीएम केअर फंडातील पैसे वापरा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा दाखला दिला होता. ठाकरेंनी राज्य सरकारला शहाणपण शिकवू नये. कोविडसाठीच्या फंडातले 600 कोटी ठाकरे सरकारच्या चुकीमुळे खर्च करता येत नाहीत, असा आरोपही फडणवीसांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. अंगलट आलं की फडणवीस फाटे फोडतात, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.
राज्यातील नुकसानग्रस्तांना सरकारने जाहीर केलेल्या मदतीवरुन उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारची मदत तुटपुंजी आणि थट्टा करणारी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ही बातमी वाचा:
























