एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंची अमित शाहांना मिठी, शिवसेनेचे होर्डिंग्सच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन
अमित शाह-उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना मारलेल्या मिठीचे शिवसेनाभवनासमोर भले मोठे होर्डिंग्स लावले आहेत. शिवसेना-भाजप युती हिंदुत्वासाठी, देशप्रेमासाठी केल्याचे हॉर्डिंगवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

मुंबई : भाजपवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने पुन्हा भाजपशी युती केली आहे. युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेची सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली जात आहे. सोबतच विरोधी पक्षांकडूनही शिवसेना भाजप युतीवर टीका केली जात आहे. काल राष्ट्रवादीने शिवसेना भवनासमोर होर्डिंग्स लावून भाजपबरोबर केलेल्या युतीची खिल्ली उडवली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुंबईत होर्डिंग्सच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन सुरु केले आहे. अमित शाह-उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना मारलेल्या मिठीचे शिवसेनाभवनासमोर भले मोठे होर्डिंग्स लावले आहेत. शिवसेना-भाजप युती हिंदुत्वासाठी, देशप्रेमासाठी केल्याचे हॉर्डिंगवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. माहीम विधानसभा मतदार संघाचे स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी हे होर्डिंग्स लावले आहेत. होर्डिंगवर शिवसेना सचिव आणि उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांचाही सरवणकर यांच्यासोबत फोटो आहे.
स्वबळाची तलवार म्यान, अफझलखानाशी गळाभेट, लोकसभा-विधानसभेसाठी शिवसेना-भाजप युतीची घोषणा
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची घोषणा शिवसेना आणि भाजपने नुकतीच केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीत शिवसेना 23, तर भाजप 25 जागा लढणार आहे. विधानसभेसाठी घटकपक्षांशी चर्चा करुन उरलेल्या जागा शिवसेना आणि भाजप निम्म्या निम्म्या वाटून घेणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं. जागावाटप आणि जबाबदारीचं वाटप समसमान करु. आपला विचार, ध्येय, धोरण, दृष्टी एक आहे. तर गेली 50 वर्ष ज्यांच्याशी लढत आलो, त्यांच्या हातात हा देश द्यायचा का, हा प्रश्न आहे. शिवसेना-भाजप एकदिलाने एकत्र आले, तर हा एक मजबूत देश बनेल. समविचारी नाही तर काही अविचारी लोक एकत्र आले आहेत, अशा शब्दात महाआघाडीवर टीका करताना आम्ही साफ मनाने एकत्र येत असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं.आणखी वाचा























