(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई: आदिवासी विकास मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आदिवासींचे ठिय्या आंदोलन, पोलिसांची तारांबळ
Tribal Protest in Mumbai : आदिवासी मंत्री के.सी. पाडवी यांच्या शासकीय निवासस्थाना बाहेर आदिवासींनी अचानकपणे ठिय्या आंदोलन केले.
Tribal Protest in Mumbai : वनजमिनीच्या मुद्यावर आज राज्यभरातील आदिवासींनी मुंबईत आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. अचानकपणे आंदोलक जमा झाल्याने पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली. वनजमिन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि आदिवासी कसत असलेली जमिनी त्यांच्या नावावर करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी म्हटले की, हे आंदोलन वनजमिनीच्या हक्कासाठी आंदोलन सुरू आहे. आदिवासी मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. राज्यात या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. अद्यापही वन जमिनीवरील आदिवासींचे दावे मान्य करण्यात आले नाहीत. आदिवासी कसत असलेल्या जमिनीवरील पिके वनविभागाकडून नष्ट करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. मागील महिन्यात आदिवासी मंत्री के.सी. पाडवी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरही प्रश्न प्रलंबित असल्याचे प्रतिभा शिंदे यांनी म्हटले. वनविभागाकडून कारवाई सुरू असून आदिवासींना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी विकास मंत्री काय म्हणाले?
आदिवासींच्या वनजमिनीच्या प्रश्नांबाबत याआधी 16 फेब्रुवारी रोजी शिष्टमंडळासोबत भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर पुन्हा बैठक घेण्याचे ठरले होते, अधिकाऱ्यांना तशा सूचनाही देण्यात आल्या होत्य. मात्र, आज अचानकपणे आंदोलन करणे हे चुकीचे असल्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी 'एबीपी माझा'सोबत बोलताना सांगितले. या आंदोलनाआधी पूर्वकल्पना दिली असती तर बैठक घेता आली असती असेही त्यांनी म्हटले. सध्या राज्याचे विधीमंडळ अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यांचा दौरा करणे शक्य नाही. अधिवेशनानंतरचा या बैठका होऊ शकतात. मागील महिन्यात झालेल्या बैठकीनंतर काही प्रश्न सुटले आहेत. तर, वनजमिनीच्या दाव्यांबाबत विभागीय आयुक्तांकडे दावे प्रलंबित आहेत, त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर निर्णय घेता येईल असेही पाडवी यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Narayan Rane : ... तर पालिका स्वत: अनधिकृत बांधकाम तोडून त्याचा खर्चही वसूल करणार; BMCची नारायण राणेंना नोटीस
- 'दांडीबहाद्दर' मंत्री! मंत्रिमंडळ बैठकीत गैरहजर राहण्यात चढाओढ, एकाही मंत्र्याची 100 टक्के उपस्थिती नाही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha