(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai News : 'कोरोना काळात चार्टर्ड विमानानं केलेला प्रवास हा सरकारी कामांसाठीच'; माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची हायकोर्टात माहिती
कोरोना काळात चार्टर्ड विमानाने केलेला प्रवास हा सरकारी कामांसाठीच, माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची हायकोर्टात प्रतिज्ञापत्रावर माहितीविनाकारण विमानप्रवास करुन कर्जात बुडालेल्या वीज कंपन्यांवर अधिक भार टाकल्याचा भाजप नेत्याचा आरोप
Mumbai News : "कोरोना काळात कोणत्याही वैयक्तिक कामासाठी नाही तर अधिकृत शासकीय कामांसाठीचा चार्टर्ड विमानाने प्रवास केला होता," अशी माहिती राज्याचे माजी उर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात सादर केली आहे. राज्याचे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनच्या काळात विनाकारण चार्टर्ड विमानातून प्रवास करुन राज्य वीज कंपन्यांचे 40 लाख रुपये बेकायदेशीररित्या वापरल्याचा आरोप करत भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) जनहित याचिका दाखल केली आहे. त्याला उत्तर देताना नितीन राऊत यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे.
लॉकडाऊनमुळे चार्टर्ड विमानाने प्रवास करावा लागला : नितीन राऊत
या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी पार पडली. राऊत यांनी नागपूरला प्रवास करण्यासाठी 12 वेळा चार्टर्ड विमानातून प्रवास केला आणि त्यासाठी 3 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला. त्यावर राऊत यांच्यावतीने या प्रतिज्ञापत्रातून उत्तर देण्यात आलं आहे. त्यानुसार, आपण चार्टर्ड विमानासाठी केलेला खर्च हा बेकायदेशीर, मनमानी आणि सार्वजनिक निधीचा अपव्यय करणारा होता. हा याचिकाकर्त्यांना आरोप चुकीचा असल्याचे सांगत त्यांचा दावा राऊत यांनी तो फेटाळून लावला. नागपूरचे पालकमंत्री या नात्याने आपल्याला प्रशासकीय कामासाठी पूर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यात नियमितपणे जाव लागत होतं. त्यामुळे आपण प्रशासकीय कामासाठीच नागपूरला गेलो होतो, ज्यात दैनंदिन कामकाजाची देखरेख, वीज कंपन्यांची दैनंदिन कामं, कोरोनाकाळातील परिस्थिती आणि निसर्ग चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या समस्यांचं निराकरण करणं इत्यांदीचा समावेश होता, असा खुलासाही राऊत यांनी प्रतिज्ञापत्रातून केला आहे. सामान्यतः रेल्वे आणि व्यावसायिक विमानाने आपण नागपूरला जातो. मात्र, लॉकडाऊनमुळे चार्टर्ड विमानाने प्रवास करावा लागल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्याची दखल घेत हायकोर्टाने याचिकेची सुनावणी 10 ऑक्टोबर रोजी निश्चित केली.
काय आहे याचिका?
वीज निर्मिती आणि वितरण कंपन्यांकडून माहितीच्या अधिकाराखाली (आरटीआय) मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊनच्या कालावधीत नितीन राऊत यांनी चार्टर्ड विमानातून अनेकदा प्रवास केला. तसेच प्रशासकीय कामाचे कारण देत वीज कंपन्यांना बिल भरण्यास भाग पाडले, असा आरोप विश्वास पाठक यांनी या याचिकेतून केला आहे. नितीन राऊत यांनी लॉकडाऊनच्या काळात मुंबई, नागपूर, हैदराबाद आणि दिल्ली दरम्यान अनेकदा चार्टर्ड विमानातून प्रवास केला, यासाठी कर्जबाजारी असलेल्या वीज कंपन्यांना 40 लाख रुपयांची बिलं भरण्यास भाग पाडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वीज कंपन्यांनी खर्च केलेला पैसा हा 'सार्वजनिक पैसा' असून त्याचा मंत्र्यांनी वैयक्तिक कारणांसाठी वापर केल्याचा आरोप करत ऊर्जामंत्र्यांच्या दबावाखाली राज्य वीज कंपन्यांनी या प्रवासासाठी पैसे दिल्याचाही आरोप याचिकेतून केला आहे. त्यामुळे मंत्र्यांकडून प्रवासासाठी झालेल्या खर्चाची भरपाई वसूल करण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावे अशी मागणी पाठक यांनी केली आहे.