...म्हणून आंतरजिल्हा एसटीचा निर्णय स्थगित केला : अनिल परब
राज्यात अडकलेल्या लोकांना एसटी मोफत बससेवा देणार असल्याचं अनिल परब यांनी शनिवारी (9 मे) जाहीर केलं होतं. परंतु दुसऱ्या दिवशीच म्हणजे 10 मे रोजी मदत व पुनर्वसन विभागाने या निर्णयात बदल केले. त्याविषयी अनिल परब यांनी आज स्पष्टीकरण दिलं.आंतरजिल्हा टप्प्याटप्प्याने सेवा सुरु करण्याचा विचार असल्याचं अनिल परब यांनी यावेळी सांगितलं.
मुंबई : "लोकांच्या मनात जबरदस्त भीती आहे. रेड झोनमधून इतर जिल्ह्यामध्ये माणसं पाठवू नका, कोरोना पसरवू नका, अशा तक्रारी आमच्याकडे आल्या. काही लोकांनी विरोध केला, त्यामुळे आम्ही ताबडतोब आंतरजिल्हा एसटीचा निर्णय स्थगित केला," असं स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलं. तसंच आंतरजिल्ह्यात टप्प्याटप्प्याने सेवा सुरु करण्याचा विचार असल्याचंही ते म्हणाले.
राज्यात अडकलेल्या लोकांना एसटी मोफत बससेवा देणार असल्याचं अनिल परब यांनी शनिवारी (9 मे) जाहीर केलं होतं. परंतु दुसऱ्या दिवशीच म्हणजे 10 मे रोजी मदत व पुनर्वसन विभागाने या निर्णयात बदल केले. या विभागाच्या पत्रकात महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेल्या इतर राज्यातील प्रवाशांना महाराष्ट्रातील त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि इतर राज्यात अडकलेले लोक जे महाराष्ट्राच्या सीमेवर आले आहेत त्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यासाठीच मोफत एसटी प्रवास असेल असं सांगण्यात आलं. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन सरकारच्या विभागांमध्येच समन्वय नसल्याचं समोर आलं होतं. त्यावर अनिल परब यांनी आज (11 मे) माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं.
"मोफत एसटी बस सेवेचा निर्णय झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच मदत आणि पुनर्वसन खात्याची प्रेस नोट निघाली. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ही सेवा परराज्याच्या सीमेवर जाणाऱ्यांसाठी आहे. त्यामधून आंतरजिल्ह्याचा उल्लेख काढून टाकलेला आहे. म्हणून आंतरजिल्ह्याची सेवा सुरु झाली नाही. आता पहिलं काम हे पायी चालत जाणाऱ्यांना सीमेपर्यंत सोडण्याचं आहे. मोठं काम झालं, अजूनही सुरु आहे," असं परब यांनी सांगितलं.
मोफत एसटी बसच्या निर्णयाबाबत सरकारचं घुमजाव? नव्या अटींमुळं प्रवाशांचा संभ्रम!
...म्हणून आंतरजिल्ह्याचा निर्णय थांबवला! अनिल परब म्हणाले की, "एसटीच्या बाबतीत राज्य सरकारने निर्णय घेतला होता की परराज्यातील लोकांना आपल्या राज्यातील सीमेवर, जे परराज्यातून सीमेवर आले आहेत त्यांना आपापल्या गावी आणि आंतरजिल्ह्यात अडकलेल्यांना आपल्या गावी जाण्यासाठी मोफत एसटी बस सेवा देऊ. त्यानंतर कार्यवाही सुरु केल्यानंतर बऱ्याच ठिकाणाहून रेड झोनमधून बाकीच्या जिल्ह्यात माणसं पाठवू नका, कोरोना पसरवू नका, अशा काही तक्रारी आमच्याकडे आल्या. लोकांच्या मनात भीती जबरदस्त आहे. काही लोकांनी विरोध केला. म्हणून आम्ही ताबडतोब आंतरजिल्ह्याचा निर्णय थांबवला."
जवळपास 5000 लोकांना परराज्याच्या सीमेवर सोडलं एसटीने एका दिवसात जवळपास पाच हजार लोकांना परराज्याच्या सीमेवर सोडल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. "जे लोक परराज्याच्या सीमेवर जाऊ इच्छित आहे, त्यांना आजही एसटी मोफत आहे. गेल्या दोन दिवसांपासून जे चित्र उभं राहिलं होतं जे लोक चालत निघाले आहेत, अशा लोकांना आम्ही एसटीच्या माध्यमातून आपल्या राज्याच्या सीमेवर सोडण्याचं काम केलं आहे. काल एका दिवसात 250 ते 275 बसमधून जवळपास 5000 लोक परराज्याच्या सीमेवर सोडलं. तर तीन हजार प्रवाशांना आपल्या राज्याच्या सीमेवरुन त्यांच्या जिल्ह्यात सोडलं, अशी माहिती परब यांनी दिली.
आंतरजिल्हा टप्प्याटप्प्याने सेवा सुरु करण्याचा विचार आंतरजिल्ह्यात अडकलेल्यांना टप्प्याटप्प्याने सेवा सुरु करण्याचा विचार असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं. ते म्हणाले की, "आंतरजिल्हा प्रश्नाबाबत बैठक बोलावली असून टप्प्याटप्प्या सेवा सुरु करण्याचा विचार सुरु आहे, त्याचं अंतिम स्वरुप थोड्या वेळाने देऊ. मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन, याचं योग्य नियोजन करुन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन आंतरजिल्ह्यात अडकलेल्यांना आपापल्या ठिकाणी सोडू.
"काही ठिकाणी भीतीचं वातावरण आहे. कन्टेन्मेंट झोन वगळून इतरांना प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. परंतु बाहेर ज्या अफवा पसरल्या आहेत त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. मुंबईतून मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त येतील, अशी भीती अनेक जिल्ह्यात निर्माण झाली आहे. म्हणून पहिल्यांदा ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यातील अडकलेल्या लोकांना बाहेर काढायचं, ते टप्पे आता ठरवतोय. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतर ते जाहीर करु," असंही त्यांनी सांगितलं.
Lockdown 3 | आंतरजिल्हा एसटी सेवेचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेऊ : परिवहन मंत्री अनिल परब