बेजबाबदार वाहनचालकांच्या संख्येत वाढ, पोलिसांच्या कारवाईत 138 कोटींचा दंड वसूल
मद्यपी वाहनचालकांवरील कारवाईसंदर्भात बोलायचं झाल्यास 2015 साली तब्बल 18035 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. हेच प्रमाण 2016 मध्ये वाढल्याने मद्य पिऊन गाडी चालविणाऱ्या 20768 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
मुंबई: दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते. वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल 138 कोटी 86 लाख 59 हजार 224 रुपये एवढा दंड वसूल केला आहे. 2017 साली हाच दंड 85 कोटी 78 लाख 60 हजार 355 रुपये एवढा वसूल करण्यात आला होता.
वाहतूक पोलिसांना देण्यात आलेल्या ई-चलान कार्यप्रणालीमुळे वाहतूक पोलिस विभागात भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून आलं आहे. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली गेली असल्याचं माहिती अधिकारात समोर आलं आहे.
मद्यपी वाहनचालकांवरील कारवाईसंदर्भात बोलायचं झाल्यास 2015 साली तब्बल 18035 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. हेच प्रमाण 2016 मध्ये वाढल्याने मद्य पिऊन गाडी चालविणाऱ्या 20768 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. 2017 मध्ये 17931 वाहनचालकांवर कारवाई झाली असून 2018 मध्ये यात सर्वाधिक घट होत 11662 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
दारु पिऊन गाडी चालवल्यास 10 हजार तर गाडी चालवताना मोबाईल वापरल्यास 5 हजारांचा दंड
महत्वाचं म्हणजे 2015 सालापासून जुलै 2019 पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत ड्रिंक अॅंड ड्राईव्ह करणाऱ्या वाहनचालकांचे वय हे 18 ते 20 वर्ष वयोगटाती असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी तब्बल 1854 जणांवर कारवाई झाली आहे, तर मद्यपी महिला वाहनचालकांचे प्रमाण 367 आहे. गेल्या पाच वर्षात ड्रिंक अॅंड ड्राईव्ह करणाऱ्या 10702 वाहनचालकांच्या गाड्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
वाहतुकीचे नियम तोडल्यास जो दंड आकारला जोत होता त्यातही वाढ करण्यात आली. नव्या नियमांनुसार ड्रिंक अॅंड ड्राईव्ह केल्यास 10,000 तर गाडी चालवताना मोबाईलचा वापर केल्यास 5 हजारांचा दंड आकारला जात आहे तरीसुद्धा वाहनचालकांची बेदरकारपणे वाहन हाताळण्याची सवय काही गेलेली नाही.