Mumbai on Covid19: परदेशात जाणारे विद्यार्थी, खेळाडू, कर्मचाऱ्यांना मुंबईत 7 ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु
टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणारे खेळाडू, शैक्षणिक किंवा रोजगाराच्या उद्देशाने परदेशात जाणाऱ्यांना मुंबईत सात डेडीकेटेड लसीकरण केंद्रांवर लसी देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
मुंबई : परदेशात जाण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण आवश्यक असल्याने आता मुंबई महापालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणारे खेळाडू, शैक्षणिक किंवा रोजगाराच्या उद्देशाने परदेशात जाणाऱ्यांना आता सोमवार ते शनिवार या कालावधीत शहरातील विविध सात समर्पित कोविड लसीकरण केंद्रांवर लसी देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
शहरातील कस्तुरबा हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, सेव्हनहिल हॉस्पिटल, डॉ. विलेपार्ले कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण केंद्र, कूपर हॉस्पिटल, महानगरपालिका शताब्दी रुग्णालय, राजावाडी रुग्णालय अशा 7 ठिकाणी परदेशात जाणारे विद्यार्थी, कर्मचारी आणि ऑलिम्पिक क्रीडापटूंना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.
Tokyo Olympics-bound athletes, those travelling abroad for educational & employment purposes can now be vaccinated from Monday to Saturday, at seven dedicated COVID vaccination centers: Greater Mumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) July 13, 2021
मुंबईत तीन दिवस लसीकरण होतं बंद
मुंबईत तीन दिवसांच्या ब्रेकनंतर सोमवारी पुन्हा लसीकरण सुरु झालं आहे. सध्या मुंबईत 1 लाख 35 हजार लसीचे डोस उपलब्ध आहेत. मात्र, पुढील दोन दिवस हे डोस पुरतील. कारण दररोज कोविशील्ड लसीचे 40-50 हजार डोस मुंबईकरांना दिले जातात. त्याच वेळी, कोवॅक्सिन लसीचे 15 हजार डोस दररोज दिले जातात. मंगळवारपर्यंत लसीचा पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता होती. सध्या कोविशिल्डचे 85 हजार डोस आणि कोवॅक्सिनचे 50 हजार डोस उपलब्ध आहेत.
मुंबईतील कोरोना लसीकरण मोहीम शुक्रवारपासून ठप्प होती. पुरेशा लसींच्या साठ्याअभावी शुक्रवारी मुंबईतील लसीकरण बंद असेल असं मुंबई महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. तसेच शनिवारीही लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीनं देण्यात आली होती. तर रविवारी साप्ताहिक सुट्टीमुळे लसीकरण बंद होतं. अशातच आज (सोमवारी) अवघ्या तीन दिवसानंतर मुंबईतील लसीकरण सुरु होणार असून आज सर्व लसीकरण केंद्र सुरु राहणार आहेत. यासंदर्भातील माहिती मुंबई पाकिलेच्या वतीनं देण्यात आली.