आज विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता, महाविकास आघाडीचे नेते घेणार राज्यपालांची भेट
काँग्रेस आज विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत.
मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड ही गुप्त मतदानाऐवजी आवाजी पद्धतीने घेण्यात यावी, असा नियमात बदल करण्यात आला आहे. मात्र, ही निवडणूक गुप्त मतदानाने व्हावी अशी भाजपची मागणी आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरुन पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठरविण्याचा अधिकार सरकारचा आहे. मात्र, त्याला राज्यपालांची मान्यता आवश्यक असल्याने संघर्ष वाढणार आहे. विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांसह अनेक मुद्द्यांवर या आधीच राज्यपाल आणि महाविकास आघाडीत संघर्ष झाला आहे. आता पुन्हा एकादा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जातेय. 22 डिसेंबरपासून सुरू झालेले हिवाळी अधिवेशन 28 डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात तरी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार का? हा सर्वांनाच पडलेला प्रश्न होता. मात्र, अखेर यावर निर्णय होणार आहे. येत्या 27 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असून, 28 डिसेंबरला मतदान होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र, या निवडीवर भाजपने आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, काँग्रेस आज विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार आहे. विधानसभा अध्यक्ष पदासाठी आमदार संग्राम थोपटे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर गेल्या तीन अधिवेशन विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. 27 डिसेंबरला काँग्रेस अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे काँग्रेस आज उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्यपालांकडून निवडणुकीसाठी परवानगी मिळाल्यानंतर दिल्लीतून हे नाव जाहीर होईल, असे सांगण्यात येत आहे.
राज्यपाल त्यांच्या अधिकारानुसार निर्णय घेतील - फडणवीस
विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे जे अधिकार आहेत, त्यानुसार ते निर्णय घेतीलच. मात्र विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसंदर्भात जे काही बदल केले गेलेत, ते भारतीय संविधानाला सुसंगत दिसत नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. म्हणून आम्ही आक्षेप घेतले होते. अशाप्रकारे सर्व अधिकार काढून घ्यायचे आणि लेजिसलेचरमध्ये एक्झिक्यूटिव्हला अधिक महत्व द्यायचे हे योग्य नाही. म्हणून आम्ही त्यास विरोध करत असल्याचे फडणवीस यांनी सांगिलले. आता आधीच दोन दिवसाचे अधिवेशन शिल्लक आहे. आणखी गुंडाळून अधिवेशन किती गुंडाळणार. सुरुवातीलाच पाच दिवसाचा अधिवेशन ठेवणे म्हणजे अधिवेशन गुंडाळण्यासारखेच असल्याचा टोलाही फडणवीस यांनी सरकारला लगावला.
महत्त्वाच्या बातम्या: