मुंबईत पहिल्याच पावसात शॉक लागून तिघांचा मृत्यू
मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने अनेक सखल भागात पाणी साठलं होतं. मुंबई आणि उपनगरात एकूण 18 शॉर्ट सर्किटच्या घटना समोर आल्या आहेत.
मुंबई : मुंबईत पहिल्याच पावसात शॉक लागून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अंधेरीतील एकाचा तर गोरेगावमध्ये दोघांचा समावेश आहे. आणखी दोघांनाही शॉक लागला होता सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अंधेरीतील अण्णानगर आरटीओ ऑफिससमोर शॉक लागून काशीमा युडियार (60) या जखमी झाल्या होत्या. उपचारासाठी त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत गोरेगाव येथे शॉक लागून चार जण जखमी झाले आहेत. या सर्वांना गोरेगावमधील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र चार पैकी दोघांना मृत घोषित केलं. राजेंद्र यादव (60) आणि संजय यादव (24) अशी मृतांची नावे आहेत. तर आशादेवी यादव (5) दिपू यादव (24) यांची प्रकृती स्थिर आहे.
मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासूनचे पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळी पावसाचा जोर वाढल्याने अनेक सखल भागात पाणी साठलं होतं. मुंबई आणि उपनगरात एकूण 18 शॉर्ट सर्किटच्या घटना समोर आल्या आहेत.