मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच संजय राऊत यांनी याप्रकरणी पुन्हा एकदा आपलं मत व्यक्त केलं आहे. कंगना रनौतसोबत माझं व्यक्तीगत भांडण नाहीये, पण मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणण्याचं कृत्य, हे अत्यंत गंभीर आहे, असं संजय राऊत म्हणाले.


संजय राऊत म्हणाले की, 'भाजप नेते आशिष शेलार कंगनाने मुंबईला अक्कल शिकव्याचं गरज नाही, असं म्हणाले. त्यांनी हे जरा अधिक जोरात बोललं पाहिजे होतं. महाराष्ट्र त्यांचा सुद्धा आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रवर एखादी व्यक्ती आशा प्रकारे घाणेरड्या शब्दात टिपणी करत असेल तर हा एका पक्षाचा विषय नाही. तर राज्यातील 11 कोटी जनतेचा विषय आहे.' ते पुढे बोलताना म्हणाले की, 'कंगनाला मराठी समजतं का? कंगनाने ट्विटर अकाउंट स्वतः चालवावं, कोणत्याही राजकीय पक्षाने नाही.'


कंगनाने दिलेल्या मुंबईत येण्याच्या आव्हानासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, 'कंगना रनौत जर 9 तारखेला येत असेल तर तिला येऊ द्यात.  कंगना जे मुंबईबद्दल बोलली त्या विरोधात फक्त शिवसेनेने आंदोलन केले नाही. हे कोणत्या पक्षाचं आंदोलन आहे, म्हणून याकडे का बघताय. या आंदोलनात ज्या ठिकाणी विरोध केला त्यामध्ये इतर राजकीय पक्ष सुद्धा होते. पोस्टरवर फक्त मतं मागायला शिवाजी महाराज नसतात हे बाकीच्यांना सुद्धा कळलं पाहिजे.'


काय आहे प्रकरण?


कंगना गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर सातत्याने टिका करते आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा तपास योग्य होत नसल्यावरून तिने मुंबई पोलिसांवर टीका केली. त्याची आत्महत्या नसून हत्याच आहे असं सांगतानाच मुंबई पोलिसांवर तिने अनेक गंभीर आरोप केले. मुंबई पोलिसांची आपल्याला सातत्याने भीती वाटत असल्याचं तिने सांगितलं. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी ज्या लोकांना मुंबईची इतकी भीती वाटते त्यांनी मुंबईत येऊ नये असं वक्तव्य केलं होतं.


याच विधानाचा विपरित अर्थ घेत त्याला धमकी ठरवून कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली. जी मुंबईसह महाराष्ट्राच्या जिव्हारी लागली. त्यावर अनेक मराठी, हिंदी, कलाकार ट्विटरवर व्यक्त झाले. यात सोनू सूद, रेणुका शहाणे, सई ताम्हणकर, सुबोध भावे, सायली संजीव, शेखर फडके, मंगेश देसाई, समीर विद्वांस आदी अनेक कलाकारांचा समावेश होतो. अनेकांनी मुंबई आपल्याला प्रिय असल्याचं यात म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी मात्र कंगनाच्या या वक्तव्याचा यथेच्छ समाचार घेतला. तर बीजेपीच्या समर्थकांनी कंगनाला पाठिंबा दिला.


भाजप समर्थक आणि मुंबईप्रेमी आमनेसमाने भिडल्याचं चित्र यात दिसत होतं. असं असतानाच आज कंगनाने आणखी एक ठिणगी पेटवून दिली. मी मुंबईला न येण्याबद्दल धमकावलं जात आहे. आता तर मी मुंबईत येणारच. येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मा मुंबईला येणार आहे. वेळ मी कळवेनच. कुणाच्या बापात हिंमत असेल तर त्यांनी मला रोखून दाखवावं असं आव्हान तिनं दिलं आहे. यालाच उत्तर म्हणून संजय राऊत यांचे हे ट्वीट असल्याचे बोलले जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या :