मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील सोशल मीडियावरील वाक्-युद्ध काही थांबायला तयार नाही. कंगनाने आज पुन्हा ट्वीट करुन "अनेकांनी मला मुंबईत न येण्याची धमकी मला दिली आहे. पण तरीही मी येणारचं. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला त्यांनी रोखून दाखवावं" असं आव्हान दिलं होतं. त्याला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.


संजय राऊत यांचं उत्तर
"मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. promise. जय हिंद जय महाराष्ट्र." असे ट्वीट करत राऊत यांनी कंगनाला उत्तर दिलंय.





काय आहे प्रकरण?
कंगना गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर सातत्याने टिका करते आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा तपास योग्य होत नसल्यावरून तिने मुंबई पोलिसांवर टीका केली. त्याची आत्महत्या नसून हत्याच आहे असं सांगतानाच मुंबई पोलिसांवर तिने अनेक गंभीर आरोप केले. मुंबई पोलिसांची आपल्याला सातत्याने भीती वाटत असल्याचं तिने सांगितलं. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी ज्या लोकांना मुंबईची इतकी भीती वाटते त्यांनी मुंबईत येऊ नये असं विधान केलं.





याच विधानाचा विपरित अर्थ घेत त्याला धमकी ठरवून कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली. जी मुंबईसह महाराष्ट्राच्या जिव्हारी लागली. त्यावर अनेक मराठी, हिंदी, कलाकार ट्विटरवर व्यक्त झाले. यात सोनू सूद, रेणुका शहाणे, सई ताम्हणकर, सुबोध भावे, सायली संजीव, शेखर फडके, मंगेश देसाई, समीर विद्वांस आदी अनेक कलाकारांचा समावेश होतो. अनेकांनी मुंबई आपल्याला प्रिय असल्याचं यात म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी मात्र कंगनाच्या या वक्तव्याचा यथेच्छ समाचार घेतला. तर बीजेपीच्या समर्थकांनी कंगनाला पाठिंबा दिला.


भाजप समर्थक आणि मुंबईप्रेमी आमनेसमाने भिडल्याचं चित्र यात दिसत होतं. असं असतानाच आज कंगनाने आणखी एक ठिणगी पेटवून दिली. मी मुंबईला न येण्याबद्दल धमकावलं जात आहे. आता तर मी मुंबईत येणारच. येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मा मुंबईला येणार आहे. वेळ मी कळवेनच. कुणाच्या बापात हिंमत असेल तर त्यांनी मला रोखून दाखवावं असं आव्हान तिनं दिलं आहे. यालाच उत्तर म्हणून संजय राऊत यांचे हे ट्वीट असल्याचे बोलले जात आहे.