मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगनाने ट्विटवरुन केली होती. यानंतर अनेक सेलिब्रिटींनी कंगनाचा समाचार घेतला आहे. 'उचलली जीभ, लावली टाळ्याला', अशा शब्दात अभिनेत्री रेणुका शहाणेंनी कंगनावर संताप व्यक्त केला आहे.


रेणुका शहाणे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की,  मुंबई असं शहर आहे, जिथं आपलं बॉलिवूड स्टार व्हायचं स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळं कुणीही आपल्याकडून या शहराप्रती आदर व्यक्त व्हावा, अशीच अपेक्षा व्यक्त करेन. तू पीओकेसोबत मुंबईची तुलना केलीस, हे भीतीदायक आहे. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, असं रेणुका शहाणे यांनी म्हटलं आहे.





प्रिय रेणुकाजी जेव्हा सरकारच्या खराब कारभारावर टीका केली जाते, तेव्हा ती प्रशासन आणि सरकारवर एकसमान पद्धतीनं केली जाते, मला विश्वास नाही की आपण इतक्या भोळ्या आहात. आपणसुद्धा तहानलेल्या गिधाडाप्रमाणे माझ्या रक्ताचा, माझ्या मांसाचा तुकडा घेण्याची वाट पाहत होता? आपल्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत, असं कंगनानं म्हटलं आहे.





आम्हीही सर्वजण सरकारवर टीका करतो. पण "मुंबई पीओके का वाटत आहे" हे मला मुंबई आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्यात थेट तुलना असल्यासारखं वाटतं. तुझी तुलना खरोखर पटण्यासारखी नाही. मुंबईकर म्हणून मला ते आवडलं नाही! तुझ्याकडून आणखी चांगल्याची अपेक्षा करणे हा कदाचित माझा भोळेपणा असेल.





अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं कंगना म्हणाली होती. कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. तसंच तिला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं परत येऊ नये असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता कंगनानं संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.


कंगना रानौतकडून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर; सोशल मीडियावर संताप


संजय राऊत यांनी धमकी दिल्याचा कंगनाचा आरोप
“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असं म्हटलं. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असं कंगना म्हणाली.


...तर चंबू गबाळ आवरुन आपल्या राज्यात जावं; संजय राऊतांकडून कंगनाचा समाचार


काय म्हणाले संजय राऊत
कंगनाच्या 'मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकार किंवा थेट केंद्राकडून सुरक्षा द्या, पण मुंबई पोलिसांकडून नको.' या ट्वीटनंतर संजय राऊतांनी कंगनाचा चांगलाच समाचार घेतलाय. राऊत म्हणाले होते की, 'मुंबई पोलिसांवर अविश्वास तुम्ही दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरावे आपल्या राज्यात जावं. हा काय तमाशा चाललाय'. 'राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर उत्तर दिलं पाहिजे, मग ते कोणी असेल. या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही तर बेईमानी आहे. अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर हीसुद्धा मोठी बेईमानी आहे. त्यामुळं मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी हा विषय गांभीर्यानं घेत अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे.' अशी मागणी देखील खासदार संजय राऊत यांनी केली आहे. कंगना रणौत सारख्यांना किती महत्व द्यायचं हे मीडियाने ठरवलं पाहिजे. ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे पुरावे द्यावेत, असा सवाल त्यांनी केला होता.


महत्त्वाच्या बातम्या :