मुंबई : मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत काम करणाऱ्या चार जणांना पुन्हा कोरोनाची लागण झाली असून त्यांना ही कोरोनाची लागण कशी झाली? तसेच त्यांच्या शरीरात असणारा विषाणू आणि याअगोदर लागण झालेला कोरोनाचा विषाणू सारखाच आहे का? याची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे सांगतिले जात आहे. काही काही दिवसांपूर्वीच हॉंगकॉंग येथे एका कोरोना झालेल्या व्यक्तीला जो पूर्ण बरा होऊन घरी गेला आहे. त्याला पुन्हा कोरोना झाल्याचे आढळून आले आहे. महत्वाचे, त्या व्यक्तीच्या आधीच्या कोरोनाचा विषाणू (व्हायरस) आणि आता ज्यामुळे आता कोरोना झाला आहे, त्या विषाणूमध्ये फरक आढळून आला आहे. त्यामुळे तेथील शास्त्रज्ञांनी या व्यक्तीला कोरोनाचा पुनर्संसर्ग (रीइन्फेक्शन) झाल्यावर शिक्कामोर्तब केले होते.


मार्च महिन्यापासून मुंबई शहरातील आरोग्य व्यवस्थेतील सर्व कर्मचारी कोरोनाशी जोरदार मुकाबला करत आहेत. अनेक दिवस भारतात सर्वात जास्त कोरोनाची रुग्णसंख्या असणारे शहर म्हणून मुंबईची ओळख होती. मात्र येथील आरोग्य यंत्रणेने रात्रं-दिवस काम करत येथील रुग्णसंख्येला आळा घालण्यात यश मिळविले होते.


मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी 'एबीपी माझा डिजिटल' सोबत बोलताना संगितले की, "पुन्हा चार जणांना कोरोना झाल्याचे प्रकरण समोर असून चारही जण महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत काम करीत असून त्यापैकी 2 डॉक्टर असून, 1 परिचारिका आहे आणि अन्य 1 जण आरोग्य व्यवस्थेत काम करणारच आहे. चारही जणांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. या चोघांना कोरोनाची लागण पुन्हा कशी झाली? त्याशिवाय त्या चौघांमध्ये कोणत्या स्वरूपाचे विषाणूं आहेत त्याची तपासणी करण्याचे काम सुरु आहे. यापैकी काहीनी यापूर्वी कस्तुरबा रुग्णालयात काम केले होते. मात्र त्यांना आताच पुनर्संसर्ग (रीइन्फेक्शन) बोलणे उचित ठरणार नाही."


वैद्यकीय तज्ञांच्या मते, कोरोनाचा संसर्ग पुन्हा होण्याचे दोन प्रकार असू शकतात. त्यामध्ये एक म्हणजे ज्या व्यक्तीला कोरोना होऊन गेला आहे आणि पुन्हा कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्या व्यक्तीच्या नमुन्यात ज्या आधीच्याच विषाणूपासून कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकीच एखादा जुना विषाणू शरीरात कुठेतरी आतड्यांमध्ये राहिला असेल आणि त्याने पुन्हा डोकं वर काढले असेल तर त्या संसर्गाला जुना संसर्ग उफाळून येणे (रिअॅक्टिव्हेशन) असं म्हणतात, याच्या आणखी काही शक्यता असू शकतात. तर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर पुन्हा कोरोना झाला असे म्हणायचे असेल तर त्याला अगोदर झालेल्या कोरोनाचा विषाणू आणि आता पुन्हा चाचणी पॉजिटीव्ह आल्यानंतरचा विषाणू वेगळा असणे अपेक्षित आहे. म्हणजेच त्या विषाणूत काही जनुकीय बदल आढळून आले असतील तर त्या व्यक्तीला पुनर्संसर्ग (रीइन्फेक्शन) झाले आहे असे म्हणतात. मात्र हे माहित होण्याकरिता त्या व्यक्तीच्या नमुण्याचा विशेष तपास करणे गरजेचे असते. त्यास विषाणूचे जनुकीय अनुक्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) असे म्हणतात. या तपासात विषाणूचे जनुकीय बदल पाहिले जातात.


हॉंगकॉंग मधील 33 वर्षाच्या व्यक्तीला पुन्हा कोरोना झाल्याचे आढळून आले आहे. ज्यावेळी साडे चार महिन्यापूर्वी पहिल्यांदा त्या व्यक्तीला कोरोना झाला होता तेव्हा त्याला सौम्य स्वरुपाची लक्षणे होती. मात्र दुसऱ्यावेळी त्याची जेव्हा स्पेन वरून परत आल्यावर तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याची चाचणी सकारात्मक आली, मात्र त्यावेळी त्याला कोणत्याही स्वरूपाची लक्षणे नव्हती. तेथील शास्त्रज्ञांनी जेव्हा त्याच्या विविध चाचण्या केल्या तेव्हा त्यामध्ये विषाणूची उपजाती (पहिल्यापेक्षा आताच्या विषाणूत बदल ) आढळून आल्याचे दिसले आहे. या रुग्णामुळे जगात दुसऱ्यावेळा कोरोना होत असल्याची ही पहिलीच केस आहे, असे सांगण्यात येत आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित खाटा राखीव ठेवण्याच्या निर्णयाला तीन महिन्यांची मुदतवाढ


'पर्युषण' प्रमाणे 'फरवार्दियान'निमित्त अग्यारी खुली करण्याची परवानगी द्या, बॉम्बे पारसी पंचायतीची हायकोर्टात याचिका