Thane Rada : एवढा राडा झाला, पण उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा साधा उल्लेखही टाळला; राजकारण नेमकं काय?
Uddhav Thackeray Vs Raj Thackeray : ठाण्यातील राड्यानंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना काय प्रत्युत्तर देणार, काय बोलणार याकडे लक्ष होतं. पण उद्धव ठाकरेंनी त्याचा कोणताही उल्लेख केला नाही.
मुंबई: उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) कारवर शेण फेकलं, बांगड्या फेकल्या, नारळ फेकून ताफ्यातील गाड्यांच्या काचा फोडल्या, थेट उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याच्या ठिकाणी घुसून राडा केला... आता मनसेच्या या कृत्याला उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून उत्तर देणार असं सर्वाना वाटत असताना झालं मात्र उलटंच. ठाण्यात एवढा राडा झाला असतानाही उद्धव ठाकरे असो वा संजय राऊत, यांनी आपल्या भाषणात राज ठाकरेंचा (Raj Thackeray) कोणताही उल्लेख केला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सरळसरळ त्याकडे दुर्लक्ष करून आपलं टार्गेट फक्त भाजप आणि एकनाथ शिंदे असल्याचा संदेश दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राज ठाकरेंचा इशारा अन् मनसैनिक आक्रमक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या टाकल्याची घटना घडली होती. ही गोष्ट मनसेच्या मोठी जिव्हारी लागली. त्यानंतर मनसेच्या नेत्यांकडून प्रतिक्रियाही आल्या. खुद्द राज ठाकरेंनीही यावर प्रतिक्रिया देत, माझ्या नादी लागू नका नाहीतर कार्यकर्त्यांचं मोहोळ उठलं तर सभाही घेऊ देणार नाहीत असा इशाराच दिला.
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांना तशी संधीही मिळाली. शनिवारी संध्याकाळी ठाण्यातील रंगायतन सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दिल्ली दौऱ्यावरून टीका झाल्यानंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार, विरोधकांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
मनसे आक्रमक आणि ठाण्यात राडा
उद्धव ठाकरे ठाण्यात येत असतानाच आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्या. ठाकरेंच्या गाड्यांच्या ताफ्यावर नारळ फेकल्याने अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. एवढं करूनही मनसे कार्यकर्ते शांत बसले नाहीत. मनसेच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची सभा असलेलं ठिकाण, रंगायतन गाठलं अन् राडा सुरू केला. त्या ठिकाणचे बॅनर्स फाडले आणि जोरदार घोषणाबाजी केली.
शिवसैनिकांना काय सुरू आहे हे समजायच्या आतच मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. त्यामध्ये महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा उल्लेख टाळला
मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या राड्यानंतर आता उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात एकनाथ शिंदे आणि भाजपच्या केंद्रातील नेतृत्वावर हल्लाबोल केला, अनेक वार केले अन् विधानसभेच्या निवडणुकीसाठी आव्हानही दिलं. पण एवढा राडा होऊनही उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे वा त्यांच्या मनसेच्या कार्यकर्त्यांचा मात्र साधा उल्लेखही केला नाही.
टार्गेट फक्त शिंदे आणि भाजप
कारवर शेण फेकल्यानंतर उद्धव ठाकरे काहीतरी बोलतील असं वाटत असताना तसं काही झालं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्याकडे सरळसरळ दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं. त्याचवेळी विधानसभेसाठी आपलं टार्गेट फक्त एकनाथ शिंदे आणि भाजप हेच असेल असा संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकीय वातावरण तापत असल्याचं चित्र आहे. ठाण्यातील राड्यावर आता जरी उद्धव ठाकरे काही बोलले नसले तरीही ते शांत राहतीलच असं नाही. त्यामुळे आगामी काळात ठाकरे विरुद्ध भाजप यासोबत ठाकरे विरुद्ध ठाकरे असाही सामना रंगण्याची चिन्हं आहेत.
ही बातमी वाचा :