चोरांच्या एका चुकीमुळे पोलिसांकडून 24 तासात गुन्ह्याची उकल, धावत्या रिक्षातून पडून मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे प्रकरण
चोरांच्या एका चुकीमुळे पोलिसांनी चोवीस तासात गुन्ह्याची उकल केली आहे. धावत्या रिक्षात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मोबाईल हिस्कवल्याने रस्त्यावर पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.
ठाणे : धावत्या रिक्षात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मोबाईल हिस्कवल्याने रस्त्यावर पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. चोरांनी केलेल्या एका चुकीमुळे दोन्ही चोरांना 24 तासांच्या आत पकडण्यात नौपाडा पोलिसांना यश आले आहे. मात्र, एका महिलेचा जीव गेल्यानंतर इतर महिला सुरक्षित आहेत का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
बुधवारी रात्री साडेसात ते आठ दरम्यान दोन मैत्रिणी विवियाना मॉलमध्ये काम करून आपल्या घरी निघाल्या होत्या. आज कामावरचा त्यांचा हा दुसराच दिवस होता. त्यापैकी एक होती कनमिला रायसिंग. त्यांची रिक्षा तीन महामार्गावर तीन हात नाका उड्डाणपुलाच्या जवळ असतानाच कनमिला यांना फोन आला, त्या फोनवर बोलत होत्या. त्याचवेळी अचानक बाहेरून दुचाकीवर आलेल्या 2 चोरांपैकी एका चोराने कनमिला यांच्या हातातला मोबाईल हिस्कावला, अचानक झालेल्या या हल्ल्याने त्या घाबरल्या आणि मोबाईल पुन्हा घेण्यासाठी बाहेर झुकल्या. अश्यात त्यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर पडल्या आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
कनमिला विवियना मॉलमध्ये काम करत होत्या. त्यांचा कामाचा दुसराच दिवस होता. मात्र नशिबाने त्यांना साथ दिली नाही. केवळ 10 हजारांच्या मोबाईलमुळे त्यांना जीव गमवावा लागला. ज्यांनी हे कृत्य केले त्या चोरांना मागे काय घडले याची कल्पना देखील नव्हती. तीन हात नाका इथून मोबाईल चोरून ते घोडबंदर रोडला गेले. तिथून आपल्या घरी भिवांडीला ते गेले. तिथे नवीनच चोरलेल्या या मोबाईलमध्ये त्यापैकी एकाने स्वतःचे सिम कार्ड टाकले आणि इथेच चूक झाली आणि पोलिसांनी त्यांचे लोकेशन शोधले. "पोलीस पथकाने या घटनेचा तपास 24 तासात लावला, या दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे, त्यांनी केलेल्या मागील गुन्ह्यांचा तपास आम्ही करणार आहोत", पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले.
या चोरांवर भिवंडी येथील 2 पोलीस स्टेशनमध्ये आधी देखील चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे बाईकवर येऊन असे मोबाईल चोरायचे हीच त्यांची मोडस ओप्रेंडी असल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, जर या चोरांनी सिम कार्ड टाकून मोबाईल सुरू करायची चुकी केली नसती तर? पोलीस 24 तासात शोध लावू शकले असते का?
काही दिवसांपूर्वीच कळवा स्थानकात अशीच घटना घडली होती. धावत्या ट्रेनमध्ये चढून मोबाईल चोराने महिलेचा मोबाईल हिसकवला. यात चोर तर सुखरूप राहील मात्र ती महिला ट्रेन बाहेर पडून मृत्युमुखी पडली. वारंवार अश्या घटनांतून हेच सिध्द होतंय की महिला या ट्रेन असो किंवा रस्ता कुठेही सुरक्षित नाहीत.