(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतातील दहशतवादी कृत्यांसाठी डी कंपनीकडून रसद; एनआयएच्या आरोपपत्रात दावा
Dawood Ibrahim : देशातील दहशतवादी कृत्यांसाठी दाऊन इब्राहिमकडून पैसा पाठवल्याचं सलीम फ्रुट प्रकरणात एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.
मुंबई : दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा (Terror Funding) केल्याप्रकरणी एनआयएनं (NIA) काही दिवसांपूर्वी आरीफ भाईजान, शब्बीर शेख आणि मोहमम्द सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुट (Salim Fruit) यांना अटक केली होती. हे तिघेही दाऊदचा (Dawood Ibrahim) साथीदार आणि कुख्यात गुंड छोटा शलीकचे (Chhota Shakeel) नातेवाईक आहेत. त्यांच्या अटकेनंतर एनआयएनं तपासाच्या आधारावर शनिवारी मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. ज्यात या तिघांसह दाऊद आणि छोटा शकील यांच्यावरही एनआयएनं गंभीर आरोप केले आहेत.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भारतातील दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना हवालामार्फत 'मोठी रक्कम' पाठवल्याचा आरोप राष्ट्रीय तपास संस्थेनं आपल्या आरोपपत्रातून केला आहे. इतकंच नव्हे तर काही बडे व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठी डी कंपनीनं एक विशेष सेल स्थापन केल्याचा दावाही या आरोपपत्रातून केला आहे.
आरोपपत्रातील एनआयएचे दावे
दाऊदनं पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीनं भारतात आपल्या दहशतवादी कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. लोकांमध्ये भीती निर्माण करून मुंबईसह इतर भागात दहशतवादी हल्ले करणं तसेच राजकीय नेते आणि प्रतिष्ठित व्यावसायिकांसह अन्य काही व्यक्तींवर हल्ले करून लोकांमध्ये दहशत निर्माण करणं हाच यामागचा मूळ हेतू आहे. डी कंपनीनं यासाठी एक विशेष युनिट स्थापन केल्याची माहिती मिळाल्याचं एनआयएनं या आरोपपत्रात म्हटलेलं आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींनी परदेशात राहणाऱ्या फरार आरोपींकडून हवालामार्फत मोठी रक्कम मिळवल्याचंही तपासातून स्पष्ट झालेलं आहे.
साल 2011 मध्ये आणि त्यानंतरही आरोपी सलीम कुरेशीनं शकील आणि दाऊदच्या सांगण्यावरून मुंबईतील सुमारे 2.70 कोटी किंमतीचे दोन फ्लॅट पीडितांना धमकावून हडप केल्याचं एनआयएच्या तपासात उघड झालेलं आहे. तसेच सलीम फ्रूटनं दुसऱ्या एका प्रकरणात लोकांना धमकावून 53.75 लाख रुपये उकळल्याचंही समोर आलं असून अन्य काही प्रकरणातही त्यानं दाऊद आणि छोटा शकीलच्या नावानं धमक्या देऊन पैसे उकळत असल्याचं समोर आल्याची माहिती एनआयएनं या आरोपपत्रातून दिली आहे. लवकरच या प्रकरणी आरोपनिश्चितीची प्रक्रिया पार पाडून खटल्याला मुंबई सत्र न्यायालयात सुरूवात केली जाईल.
ही बातमी वाचा :