टाटा ग्रुपच्या सीईओंच्या घर खरेदीची चर्चा; मुंबईत विकत घेतला लक्झरी फ्लॅट; किंमत माहितीय का?
टाटा समूहाचे (Tata Group) चेअरमन एन चंद्रशेखरन (N. Chandrasekharan) यांच्या नवीन घराची सध्या खूप चर्चा सुरु आहे. त्याचं कारणही तसंच आहे.
Mumbai News : टाटा समूहाचे (Tata Group) चेअरमन एन चंद्रशेखरन (N. Chandrasekharan) यांच्या नवीन घराची सध्या खूप चर्चा सुरु आहे. त्याचं कारणही तसंच आहे. एन चंद्रशेखरन यांनी मुंबईतील पेडर रोड लक्झरी टॉवरमध्ये 98 कोटी रुपयांना लग्झरी डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. प्रॉपर्टी मार्केटमध्ये ही एक हाय प्रोफाईल डील म्हटली जात आहे. दक्षिण मुंबईत जसलोक रुग्णालयाजवळ ही 28 मजली इमारत आहे ज्यात हा फ्लॅट आहे. गेल्या पाच वर्षांपासून चंद्रशेखरन याच इमारतीत आपल्या कुटुंबासह भाड्यानं राहत होते.
या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियानं वृत्त दिलं आहे. 2017 साली चंद्रशेखरन टाटा समूहाचे चेअरमन झाले. त्यानंतर ते आपल्या कुटुंबासह या ठिकाणी भाड्याने राहत होते. हा फ्लॅट डुप्लेक्स आहे. 11व्या आणि 12व्या मजल्यावर 6,000 स्क्वेअर फूटचा कार्पेट एरिया असलेला हा फ्लॅट आहे. चंद्रशेखर काही वर्षांपासून 20 लाख रुपयांचं दरमहा भाडं या फ्लॅटसाठी द्यायचे.
चार दिवसांपूर्वी एन. चंद्रशेखर, त्यांच्या पत्नी ललिता आणि मुलगा प्रणव यांच्या नावाने या घराच्या खरेदीचा करार झाला. त्यांनी 1.6 लाख रुपये प्रतिस्क्वेअर फूट या दराने हा ड्युप्लेक्स विकत घेतला आहे. 2008 साली ही इमारत बांधलेली आहे. समीर भोजवानी आणि विनोद मित्तल या बिल्डर्सनी ही इमारत उभारलीय. समीर भोजवानी यांच्या जीवेश डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून चंद्रशेखरन यांनी हा फ्लॅट विकत घेतला आहे.
ही डील सध्या खूप चर्चेत आहे. मार्केट तज्ञांच्या मते अशा मोठ्या डील खूप कमी प्रमाणात होतात. मुंबईमध्ये जानेवारी 2022 पासून आतापर्यंत अशा प्रकारचे केवळ 13 हाय व्हॅल्यू करार झाले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
चंद्रा या नावाने प्रसिद्ध असलेले एन चंद्रशेखरन यांना 2016 साली टाटा सन्सच्या बोर्डमध्ये सामिल करण्यात आलं होतं. जानेवारी 2017 साली त्यांची नियुक्ती एक्झिक्युटिव्ह चेअरमनपदी करण्यात आली. ते टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि टीसीएस सारख्या संस्थेंच्या बोर्डाचे प्रमुख आहेत. सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर एन. चंद्रशेखरन यांना 'टाटा'च्या संचालक मंडळात घेण्यात आले होते. टीसीएसमध्ये 2009 सालापासून ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यानंतर टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी एन. चंद्रशेखरन यांच्याकडे देण्यात आली. एन. चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळात टाटा सन्सची चांगली प्रगती झाल्याने पुन्हा एकदा त्यांचा कार्यकाल वाढवण्यात आला आहे.