शेलारजी फार डिंग्या मारू नका, बेस्ट निवडणुकीतही तुम्ही तीर मारले नाहीत. तुम्हाला नवख्या आघाडीने चारी मुंड्याचीत केलं, तेव्हा गपगार गोधडीत पडा; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल आणि महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलमध्ये चुरशीची लढत होईल असे मानले जात होते, परंतु सर्व अंदाज खोटे ठरवत शशांक राव पॅनलने 14 जागा जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले.

Sushma Andhare on Ashish Shelar: ठाकरे बंधूंच्या पॅनलने बेस्ट पतपेढीची निवडणूक एकत्र लढवली पण त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलने 14 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व राखले. आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनेलला 7 जागा मिळाल्या. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल आणि महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलमध्ये चुरशीची लढत होईल असे मानले जात होते, परंतु सर्व अंदाज खोटे ठरवत शशांक राव पॅनलने 14 जागा जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले. 9 वर्षांपासून ठाकरे गटाचे बेस्टवर वर्चस्व होते, परंतु यावेळी शशांक राव पॅनल सत्तेत आले. मात्र, ठाकरेंच्या पॅनेलची चर्चा होऊन एकही जागा न मिळाल्याने भाजपने डिवचत ठाकरे ब्रँडवर टीका केली. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून पलटवार करण्यात आला. उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खोचक शब्दात आशिष शेलार यांना टोला लगावला. मुंबईकर ही आमचा आणि मुंबई ही आमची या ट्विटवर अंधारे यांनी प्रतिक्रिया देत फार डिंग्या मारू नका, असे म्हटले आहे.
शेलारजी फार डिंग्या मारू नका
सुषमा अंधारे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, शेलारजी फार डिंग्या मारू नका. बॅलेटवर निवडणुका घेतल्या की तुम्ही कायम तोंडघशीच पडता. शिक्षक–पदवीधर–सिनेट निवडणुकीत आम्ही तुम्हाला धोबीपछाड दिलाय. कालच्या निवडणुकीतही तुम्ही तीर मारले नाहीत. तुम्हाला नवख्या आघाडीने चारी मुंड्याचीत केल आहे. तेव्हा गपगार गोधडीत पडा..!
शेलारजी फार डिंग्या मारू नका. बॅलेटवर निवडणुका घेतल्या की तुम्ही कायम तोंडघशीच पडता. शिक्षक–पदवीधर–सिनेट निवडणुकीत आम्ही तुम्हाला धोबीपछाड दिलाय. कालच्या निवडणुकीतही तुम्ही तीर मारले नाहीत. तुम्हाला नवख्या आघाडीने चारी मुंड्याचीत केल आहे. तेव्हा गपगार गोधडीत पडा..!@ShelarAshish https://t.co/FpqjyDpxdN
— SushmaTai Andhare (@andharesushama) August 21, 2025
काय म्हणाले होते आशिष शेलार?
शेलार यांनी ट्विट करत भाजपासाठी मुंबईकरांचा शुभसंकेत असून बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले. कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला आणि "पत" आणि "पेढी"साठी लढणाऱ्यांच्या हाती मोठा भोपळा दिला. मुंबईकर, कामगार, श्रमिक आमच्याबाजूने आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पक्ष म्हणून लढलो नाही पण आमचे प्रसाद लाड आणि शशांक राव विजयी झाले. हा तर मोठा शुभसंकेत !! बॅलेट पेपरवर निवडणूका झाल्यावर हा विजय आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे तमाम तथाकथित राजकीय विश्लेषक, मतचोरी झाले म्हणणारे तथाकथित तज्ञ आणि विश्वविख्यात प्रवक्त्यांपासून गल्लोगल्लीतल्या "निर्भय"वक्त्यांपर्यंत. सगळे उघडे, नागडे झाले आहेत. भर पावसात तोंडावर आपटले आहेत. मुंबईकरही आमचा आणि मुंबईही आमची!!
यामुळेच शशांक राव पॅनल जिंकला
दरम्यान, शशांक राव पॅनलच्या विजयाचे कारण म्हणजे वर्षानुवर्षे कामगार संघटनांशी असलेले त्यांचे संबंध, चळवळींमध्ये सक्रिय भूमिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न उपस्थित करणे. काही महिन्यांत बीएमसीच्या निवडणुका होणार आहेत, बेस्टमधील सर्व कर्मचारी मराठी असल्याने, बेस्ट आणि मुंबईतील ठाकरे कुटुंबाचे नाते वेगळे राहिले आहे. मात्र, अतिआत्मविश्वास नडल्याचे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























