Suresh Dhas VIDEO : जास्त ताणू नये, लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री, उपसमितीला भेटणार; जरांगेंची भेट घेतल्यानंतर सुरेश धस काय म्हणाले?
Manoj Jarange Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जास्त न ताणता लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमितीला भेटणार असल्याचं आमदार सुरेश धस म्हणाले.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षांची भेट घेणार, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली. मराठा आरक्षण प्रकरणी या आधीही मध्यस्ती केली, आताही मध्यस्ती करून लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही धस म्हणाले. मनोज जरांगेंची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाचा पहिला दिवस पूर्ण झाला असून शनिवारीही हे आंदोलन सुरू राहणार आहे. दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.
मंत्रिमंडळ उपसमितीची भेट घेणार
मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस म्हणाले की, "आमदार प्रकाश सोळके यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींसह शनिवारी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची भेट घेणार. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन या प्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी करणार. घेऊन ही भेट घेणार. मराठा आरक्षणाचं गाऱ्हानं त्यांच्यासमोर मांडू आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू.
मनोज जरांगे यांच्या मागणीतील एक निर्णय मान्य करण्यात आली आहे. इतरही मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक आले असून यावर कोणताही निर्णय झाल्याशिवाय ते परत जाणार नाहीत असं सुरेश धस म्हणाले.
जरांगे कुणावर बोलणार?
या आधीच्या उपोषणामध्ये आपण मध्यस्ती करण्याचं काम केलं होतं. आताही मध्यस्ती करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचं सुरेश धस म्हणाले.
मनोज जरांगे हे नेहमी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करतात. त्यावर बोलताना सुरेश धस म्हणाले की, "मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असून तेच निर्णय घेणार आहेत. या आधीचे निर्णयही त्यांनीच घेतले होते. त्यांच्याकडून अपेक्षा आहे, त्यामुळेच मनोज जरांगे त्यांच्यावरच बोलणार. ते विरोधी पक्षनेत्यावर कशाला बोलतील?"
आता हे जास्त न ताणता, लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करू. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बीड जिल्हा जास्त संवेदनशील आहे. त्यामुळे बीडचे लोकप्रतिनिधींनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला भेट दिली आहे असं सुरेश धस म्हणाले.
जरांगेंसोबत काय चर्चा झाली?
मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर सुरेश धसांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यावर बोलताना धस म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांच्या मागण्या आणि त्यामागचे तांत्रिक मुद्दे यावर चर्चा झाली. त्यांनी केलेल्या मागण्या मराठा उपसमितीसमोर मांडू.
ही बातमी वाचा:























