मुंबईत शिक्षकांना रेल्वे प्रवासासाठी राज्य सरकारचा हिरवा कंदील
इयत्ता दहावीच्या मूल्यमापनाशी संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई : इयत्ता दहावीच्या मूल्यमापनाशी संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.
शिक्षकांना उपनगरीय रेल्वेमध्ये 'लेवल 2' पास देण्यात येणार असून हे रेल्वे पास ऑनलाईन एसएमएस डाउनलोडच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहेत. यासाठीची लिंक संबंधित कर्मचाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. यासर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती जमा करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई हे काम पाहतील. त्यामुळे शिक्षकांना पास मिळेपर्यत वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे हा पास नेमका कधी मिळतो याबाबत अजूनही शिक्षकांमध्ये संभ्रम आहे.
इयत्ता दहावीचा निकाल वेळेत घोषित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. मूल्यांकन करून विद्यार्थीनिहाय माहिती राज्य मंडळाकडे पाठवणे, श्रेणी तक्ता तयार करणे, इत्यादी कामे करण्यासाठी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याबाबतचा पाठविलेला प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला होता.
शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाचे गांभीर्य व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावी मूल्यमापनाशी संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेप्रवासाची मुभा दिली. त्यामुळे आता लोकल प्रवासाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली असली तरी जोपर्यंत पास मिळत नाही तोपर्यंत शिक्षक लोकल प्रवास करू शकणार नाही.
प्रत्यक्षात पास कधी मिळणार?
राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांची 50 टक्के उपस्थिती, तर दहावी आणि बारावीच्या शिक्षकांची 100 टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे, असे आदेश प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत. तसेच दहावीच्या निकालाचे काम करण्यासाठी दहावीला शिकवणारे शिक्षक आणि वर्गशिक्षक यांची उपस्थिती तर शाळांत अनिवार्य राहणारच आहे.
अनेक शिक्षक आणि शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. शिक्षक भारती संघटनेचे शिष्टमंडळ बुधवारी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार आणि सचिव असीम गुप्ता यांची भेट घेण्यास गेले असता, शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी सध्या देता येणार नाही असे स्पष्ट केले होते. जोपर्यंत मुंबई लेव्हल 3 मधून लेव्हल 2 मध्ये जात नाही तोवर शिक्षक, शिक्षकेतरांना प्रवासाची परवानगी मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, या दरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत लागावा यासाठी शिक्षकाना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून, दंड भरून लोकल प्रवास करावा लागत होते. मात्र, आता हा प्रश्न मिटला असला तरी प्रत्यक्षात पास कधी मिळणार याचीच शिक्षक वाट पाहत आहेत.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI