
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार तयार : चंद्रकांत पाटील
नागरिकांना आणि पशुधनाला पिण्याचे मुबलक पाणी देण्याचे उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मुंबई : राज्यात दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असून, दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार आहे. राज्यातील मंत्री देखील आपापल्या जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
"देशात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने, राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करुन महाराष्ट्रात आचारसंहिता शिथील करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री या नात्याने आपापल्या जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यास कोणतीही अडचण नाही. तरीही पूनर्वसन विभागाचे काम माझ्याकडे असल्याने राज्यातील दुष्काळी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आपण स्वत: राज्यभरात दौरे करणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.
"पशुधनासाठी मागेल त्या ठिकाणी चारा छावणी सुरु करण्याच्या तत्वावर राज्यात 1264 चारा छावण्या सुरु करण्यात आल्या असून, या छावण्यांमध्ये 8 लाख 32 हजार 29 जनावरे दाखल आहेत. या सर्व छावण्यांमधील दाखल जनावरांपैकी मोठ्या जनावरांसाठी रोज 90 रुपये, तर लहान जनावरांसाठी प्रतिदिन 45 रुपये याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे", अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
याशिवाय, राज्यातील 3699 गावे व 8417 वाड्यांमध्ये 4774 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच 2 लाख 74 हजार मजुरांना शासनाच्या मागेल त्याला काम या तत्वावर मजुरी देऊन राज्यातील 34 हजार 431 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्याशिवाय सुमारे 10 लाख लोकांना मजुरी देण्याची तयारी आहे, असंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.दरम्यान, मराठवाड्यात दुष्काळी स्थिती गंभीर असून, या ठिकाणी शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या आठही उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावी केली जात आहे. पण तरीही नागरिकांना आणि पशुधनाला पिण्याचे मुबलक पाणी देण्याचे उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
