एक्स्प्लोर
Advertisement
शिवस्मारक पायाभरणी : बुडणाऱ्या बोटीवरील तरुणाचा थरारक अनुभव
मदत येईपर्यंत अर्धी बोट पाण्यात बुडाली होती. बोटीतून बाहेर पडणारा शेवटचा व्यक्ती मीच होतो, असं चेतन पालकरने सांगितलं.
मुंबई : मुंबईजवळ अरबी समुद्रात आयोजित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणारी स्पीडबोट खडकावर आपटून बुडाली. या बोटीवर असलेले शिवसंग्रामचे 18 ते 20 कार्यकर्ते सुखरुप आहेत, तर सिद्धेश पवार हा कार्यकर्ता बेपत्ता असल्याची माहिती आपत्कालीन यंत्रणेने दिली आहे. अपघातानंतर पायाभरणी कार्यक्रम रद्द करण्यात आला.
बुडणाऱ्या बोटीतून सुखरुप बचावलेल्या चेतन पालकर नावाच्या कार्यकर्त्याने 'एबीपी माझा'ला आपला बोट प्रवासातील अनुभव सांगितला. 'शिवसंग्रामचे आम्ही साधारण 22 कार्यकर्ते दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास स्पीडबोटने निघालो. क्षमतेपेक्षा 4-5 जण जास्त असल्याने त्यांना बाहेर काढण्यात आलं. बोट निघाल्यानंतर अत्यंत वेगाने शिवस्मारकाच्या दिशेने चालली होती. अचानक मोठ्ठा आवाज झाला बोट जागेवरच थांबली' असं चेतनने सांगितलं.
'बोट अचानक थांबल्यामुळे सर्व जण घाबरले होते. बोटचालकाने मागील पंखा तुटल्याचं सांगितलं. त्यानंतर पुढच्या पाचच मिनिटात बोटीत पाणी शिरायला सुरुवात झाली. सर्व जण घाबरले होते. मात्र प्रसंगावधान राखत आम्ही बोटीतील पाणी बालदीने बाहेर काढलं.' असंही पुढे चेतनने सांगितलं.
'मदत येईपर्यंत अर्धी बोट पाण्यात बुडाली होती. बोटीतून बाहेर पडणारा शेवटचा व्यक्ती मीच होतो. माझ्यानंतर केवळ बोटचालक बुडणाऱ्या बोटीतून बाहेर आला' असंही चेतनने सांगितलं. बोटीचा मार्ग माहित नसावा असंही चेतन म्हणाला. बोटीत 24 जण असताना केवळ सहाच लाईफ जॅकेट असल्याकडेही चेतनने लक्ष वेधलं.
25-26 वर्षांचा सिद्धेश पवार बेपत्ता असल्याची माहिती आहे. सिद्धेश हा शिवसंग्रामचा कार्यकर्ता आहे. सिद्धेशविषयी माहिती मिळताच त्याचे मामा विक्रांत आंग्रे बेशुद्ध पडले होते.
नियोजनशून्यतेमुळे हा अपघात झाल्याची टीका शेकाप नेते जयंत पाटील यांनी केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत बसवल्याचा आरोपही पाटलांनी केला. बचावकार्यासाठी आपण दोन बोटी पाठवल्याची माहितीही जयंत पाटील यांनी दिली. पायाभरणी कार्यक्रमाला जाताना तटरक्षक दलाला सोबत का नेलं नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement