Home Made Social App: घरबसल्या बनवलं 66 लाखांचं सोशल मीडिया अॅप, कळव्यातील शालेय विद्यार्थ्यांची कामगिरी
दोन तरुणांनी लोकांचे मनोरंजन करण्यासाठी, तसेच एकमेंकाशी गप्पा मारण्यासाठी एक स्वतंत्र सोशल मीडिया अॅप तयार करण्याचे ठरविले. त्यातून निर्मिती झाली सोशियोचॅट अॅपची.
ठाणे : राज्यात कोरोना महामारीचे संकट आहे. या काळात सगळीकडे नकारात्मकता पसरत आहे. लॉकडाऊन असल्यामुळे लहान मुलांनाही घरीच बसावे लागत आहेत. मात्र या नकारात्मक वातावरणात देखील सकारात्मक विचार करून कळव्यातील 2 शालेय विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया ॲप बनवले आहे, ज्याची किंमत तब्बल 66 लाख इतकी असल्याचा दावा या मुलांनी केला आहे.
अथर्व शिंदे आणि आयुष सिंग या दोन तरुणांना घरात बसून कंटाळ आला होता. पण काहीतरी करायची इच्छा होती. या दोघांना सुरुवातीपासून कोडिंगमध्ये रस होता. त्यामुळेच या दोन तरुणांनी लोकांचे मनोरंजन करण्यासाठी, तसेच एकमेंकाशी गप्पा मारण्यासाठी एक स्वतंत्र सोशल मीडिया अॅप तयार करण्याचे ठरविले. त्यातून निर्मिती झाली सोशियोचॅट अॅपची.
या तरुणांनी एप्रिलपासून सोशियोचॅटची रचना तयार केली. लोगो आणि नावही निवडले गेले. त्यामध्ये त्यांनी एका सर्व्हरमध्ये मेपासूनच त्याची प्रोग्रामिंग सुरू केली. आणि अखेर जून 2020 मध्ये हे सोशल मीडिया अॅप तयार करण्यात ते यशस्वी झाले.
अनेक अॅपमधून आपली माहिती चोरी जाण्याची भिती असते. परंतु यामध्ये त्यांनी सुरक्षेची हमी देखील दिली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया या संस्थेतर्फे प्रमाणपत्र मिळाले आहे. दर वर्षी 8 लाखांपेक्षा जास्त अर्जदारामधून फक्त 2 ते 5 टक्के लोकांना हे प्रमाणपत्र दिले जाते. आज त्या अॅपची किंमत 6.6 दशलक्ष एवढी आहे असा त्यांनी दावा केला आहे.
अॅप बनवल्यामुळे या दोघांचे पालक प्रचंड खुश आहेत, तर हे ॲप या दोघांच्या मित्रांनी वापरण्यास सुरुवात केली आहे. आणि हे ॲप प्रोफेशनल लोकांनी बनवल्या सारखे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. लॉकडाऊन च्या काळात अनेकांनी वेगवेगळे छंद जोपासले आणि त्याद्वारे आपल्या कलेला वाव दिला. मात्र अथर्व आणि आयुष्य या दोघांनी आपल्याकडे सोबत आपल्या बुद्धीचा वापर करून घर बसल्या उत्पन्नाचे साधन देखील निर्माण केले आहे. या दोघांकडून इतर तरुणाने देखील आदर्श घ्यायची गरज आहे.