(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार, गृहमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माझा विश्वास आहे, असं खासदार मोहन डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशीची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. डेलकर यांच्या सुसाईड नोटचा उल्लेख अनिल देशमुख यांनी विधानसभेत केला. डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये दादर नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचं नाव आहे. डेलकर यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले होते, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.
मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली, कारण त्यांना महाराष्ट्र सरकारकडून न्याय मिळेल याची अपेक्षा होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माझा विश्वास आहे, असं डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. डेलकर यांच्या पत्नी आणि मुलाने पत्र लिहून प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मोहन डेलकर कोण आहेत?
मोहन डेलकर याचं वय 58 वर्षांचं होतं. वर्ष 1989 मध्ये ते दादरा आणि नगर लोकसभा क्षेत्रातून ते खासदार म्हणून निवडून आले होते. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी ट्रेड युनियन नेता म्हणून केली होती. ते काँग्रेस आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय नवशक्ती पार्टी (बीएनपी) ची स्थापना केली होती.
मोहन डेलकर यांनी तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली होती. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला आणि अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणूकीत ते निवडून आले होते. गेल्या वर्षी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर मोहन डेलकर यांनी दादरा आणि नगर हवेली येथील स्थानिक निवडणुकांसाठी जेडीयूशी करार केला होता. जेडीयूला पाठिंबा दर्शविल्यामुळे दादरा आणि नगर हवेलीमधील स्थानिक मतदानात भारतीय जनता पक्षाला जागा गमवावी लागली होती.
संबंधित बातम्या