एक्स्प्लोर
अफवा, भ्रम निर्माण करुन युद्ध जिंकता येत नाही, ‘सामना’तून मोदींवर निशाणा

मुंबई : “काँग्रेसचा पराभव होऊन मोदी यांचे राज्य लोकांनी आणले. तरीही महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, पाणी, भ्रष्टाचार व दहशतवादाचे प्रश्न कायम आहेत. सरकारचे लक्ष्य सोनिया व राहुलला तुरुंगात टाकण्याचे आहे. ते जरूर करावे, पण जनतेच्या प्रश्नांचे काय? प्रत्येकवेळी अफवा, भ्रम निर्माण करून युद्ध जिंकता येत नाही.”, असे म्हणत शिवसेनेने पुन्हा एकदा ‘सामना’तून केंद्र सरकार आणि मोदींवर निशाणा साधला आहे. ‘सामना’तून इंदिरा पर्वाची आठवण जनता पक्षाच्या काळात इंदिरा गांधींचं नेतृत्व पुन्हा देशाने स्वीकारलं, याला कारणही जनता पक्षाचं सरकारच असल्याचं ‘सामना’तून म्हटलं आहे. इंदिरा गांधींच्या काळाची आठवण करुन देत ‘सामना’तून मोदी सरकारला एकाप्रकारे इशारा देण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. ‘सामना’त म्हटलं आहे, “इंदिरा गांधी यांना पुन्हा देशाचे नेतृत्व करण्याचा मार्ग त्यावेळच्या जनता पक्षाच्या येडबंबू सरकारनेच मोकळा करून दिला होता. जनतेने हातात दिलेले राज्य करायचे सोडून हे लोक तेव्हा इंदिरा गांधींच्या मागे हात धुऊन लागले व इंदिरा गांधींना त्रास देणे हेच त्यांचे जणू ध्येय ठरले. त्यांनी इंदिरा गांधी यांना अटक करून तुरुंगात पाठवले हे एकवेळ ठीक असेल, पण तेव्हाही लोकांचा प्रश्न तोच होता की, तुम्ही जनतेसाठी काय केले व देशासाठी नवे काय केले, ते सांगा. कारण त्या काळातही इंदिरा गांधींना अटक करून व त्यांच्या विरोधात खटला दाखल करून महागाई व भ्रष्टाचार कमी झाला नव्हता. उलट तो वाढला. त्यामुळे इंदिराजींचे राज्य काय वाईट होते? असा विचार लोकांनी केला. इंदिरा गांधी व त्यांच्या चिरंजीवांनी केलेले सर्व गुन्हे माफ करून जनतेने काँग्रेसला पुन्हा जोरदारपणे सत्तेवर आणले.” "काँग्रेस नौटंक्या करण्यात पटाईत" “लोकशाहीची हत्या होत आहे या सबबीखाली काँग्रेसने दिल्लीत आंदोलन केले. संसदेवर मोर्चा वगैरे नेऊन सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी यांनी स्वत:स अटक करून घेतली. अशा नौटंक्या करण्यात काँग्रेसवाले पटाईत आहेत. लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप काँग्रेसने करावा हाच खरे म्हणजे विनोद आहे.” असे म्हणत काँग्रेसवरही ‘सामना’ने टीका केली आहे. मुंबई महापालिका निवडणुका असो वा राज्यातील अनेक प्रश्नांवर एकाच सरकारमध्ये असूनही परस्पर विरोधी भूमिका असो, शिवसेना आणि भाजपमधील भांडणं अनेकदा चव्हाट्यावर आली आहेत. मात्र, आता शिवसेनेने जनता पक्षाचं सरकार कसं गेलं आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर कशा आल्या, हे सांगून भाजपला एकप्रकारे इशाराच देण्याचा प्रयत्न केला आहे.
आणखी वाचा























