(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मुंबई सेंट्रल टर्मिनस'चं नाव 'नाना शंकरशेठ टर्मिनस' होणार
मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलण्याची मागणी शिवसेनेकडून सातत्यानं करण्यात येत होती. त्यावर आता केंद्र सरकारकडून लक्ष घालण्यास सुरुवात केली असून, यासंबंधीची प्रक्रियाही सुरु झाली आहे
मुंबई : मागील बऱ्याच दिवसांपासून शहरांच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आता मुंबईच्या आणि शिवसेनेच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये मुंबई सेंट्रल टर्मिनस या रेल्वे स्थानकाचं नाव बदललं जाणार असल्याची बाब स्पष्ट होत आहे.
मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलण्याची मागणी शिवसेनेकडून सातत्यानं करण्यात येत होती. त्यावर आता केंद्र सरकारकडून लक्ष घालण्यास सुरुवात केली असून, यासंबंधीची प्रक्रियाही सुरु झाली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना याबाबची माहिती दिली.
केंद्रीय उपराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेनेचे उपनेते अरविंद सावंत यांना एका पत्राद्वारे यासंदर्भातील माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं. 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच आताच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मांडला होता', असं म्हणत त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
आता जी आद्य आणि प्रगत मुंबई दिसत आहे तिचा पाया रचणारे खुदद् शंकरशेठ आहेत. त्यांनी स्वत:चा बंगला सध्याच्या मध्य रेल्वेच्या कार्यालयाला दिला होता, स्वत:ची जमीनही त्यांनी यासाठी दिली होती. इंग्रजांना सोबतीनं घेत त्यांनी दक्षिण मुंबईता विकास घडवला. या योगदानासाठी नाना शंकरशेठ यांचं उचित स्मारक होणं आवश्यक होतं, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साततत्यानं यात पुढाकार घेतला आणि राज्य शासनानं हा प्रस्तावही मांडला, असं सांगत आपणही लोकसभेत या मागणीला उचलून धरत पत्रव्यवहार सुरुच ठेवला आणि अखेर अमित शाह यांना लिहिलेल्या पत्राचं उत्तर नुकतंच मिळालं. ज्यामध्ये नामांतराची प्रक्रिया सुरु झाली असून, हे बदल लवकरच होणार असल्याचं नमुद केल्याचं सावंत यांनी स्पष्ट केलं.