राज्यात पुढील पाच वर्ष स्थिर सरकार असेल, फक्त सगळं ठरल्याप्रमाणे झालं पाहिजे : संजय राऊत
भाजपने शिवसेनेचा सन्मान राखावा. शिवसेना-भाजपने सोबत राहण्यातच दोन्ही पक्षांचं आणि महाराष्ट्राचं हित आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात टोकाची भूमिका घेणारे संजय राऊतांनी आज नरमाईची भूमिका घेतलेली दिसली.
मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये सुरु असलेला सत्तासंघर्ष संपण्याची शक्यता आहे. सत्तास्थापना आणि खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीचं सरकार हे राज्यासाठी भल्याचं असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
सरकारमधील खातेवाटपाच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही खाते वही घेऊन बसलेलो नाही. भाजपने शिवसेनेचा सन्मान राखावा. शिवसेना-भाजपने सोबत राहण्यातच दोन्ही पक्षांचं आणि महाराष्ट्राचं हित आहेत. उद्धव ठाकरे निर्णय घेण्यास समर्थ आहेत. उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो शिवसेनेच्या सर्व नेत्यांना मान्य असेल. महाराष्ट्राची कुंडली आम्हीच बनवू, कोणते ग्रह कुठे ठेवायचे एवढी ताकद आजही शिवसेनेत आहे.
राज्यात सरकार महायुतीचं येईल. मात्र शिवसेना-भाजप युतीमध्ये सत्तावाटपाबाबत जे ठरलं होतं तसं झालं पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं. युतीमध्ये ठरल्याप्रमाणे सगळं झालं, तर राज्यात पुढील पाच वर्ष स्थिर सरकार असेल. उत्तम महाराष्ट्र घडवण्यासाठी स्थिर सरकारची गरज आहे. राज्यात अनेक समस्या तोंड वासून उभ्या आहेत. मुख्यमंत्र्यांना काम करण्याची संधी मिळायला हवी, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
शिवसेनेचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, यापुढे महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही. शिवसेनेचा आमदार फुटणे तर शक्यच नाही. प्रसारमाध्यमेही काही बातम्या पसरवत आहेत, असा टोला राऊतांनी लगावला.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे. मात्र मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या आमदाराला 145 किंवा त्यापेक्षा जास्त आमदारांचं समर्थन असायला हवं. राज्यातील कामं करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देऊ, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
भाजपकडून शिवसेनेला 26-13 ची 'ऑफर'
भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 13 मंत्रिपदांची ऑफर दिली आहे. तर भाजप स्वत:कडे 26 मंत्रिपद ठेवणार, असा हा नवा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रस्तावात मुख्यमंत्री पद, गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही खाती कोणत्याही परिस्थितीत देण्यात येणार नाहीत, हे भाजपनं स्पष्ट केलं आहे.
संबंधित बातम्या
- शिवसेनेला सत्तेच्या '50-50' आग्रहासाठी अडचणीचा आहे 'हा' इतिहास!
- उपमुख्यमंत्री पद आणि 13 मंत्रिपदं-भाजपकडून शिवसेनेला 'ऑफर'
- देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार, विधीमंडळ नेतेपदी निवड
- उपमुख्यमंत्री पद आणि १३ मंत्रिपदं-भाजपकडून शिवसेनेला 'ऑफर'
- राजकारणात कोणीच कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, अजित पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- शिवसेनेची भूमिका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी : सुधीर मुनगंटीवार
- 'मुख्यमंत्र्यांनी यू टर्न घेतला', शिवसेनेचा आरोप; संजय राऊत म्हणतात...